वैद्यकीय शिक्षण खात्याच्या अहवालातील निरीक्षण

नागपूर : वैद्यकीय शिक्षण खात्याच्या अहवालानुसार राज्यात मे २०२० ते १८ जुलै २०२१ पर्यंत करोनाच्या एकूण चाचण्यांपैकी ६४ टक्के चाचण्या या शासकीय प्रयोगशाळेत तर इतर चाचण्या खासगी प्रयोगशाळेत झाल्यात. परंतु गेल्या पन्नास दिवसांत राज्यातील एकूण चाचण्यांपैकी शासकीय प्रयोगशाळेत ७०.३३ टक्के चाचण्या झाल्या आहेत. त्यामुळे शासकीय प्रयोगशाळेतील चाचण्यांचे प्रमाण ६.२९ टक्यांनी वाढलेले दिसत आहे.

विदर्भासह राज्यातील इतरही काही भागात करोनाचा प्रभाव कमी झाला आहे. तर काही जिल्ह्य़ांत आजही मोठय़ा संख्येने रुग्ण आढळत आहेत. नागपूर जिल्ह्य़ात आजही रोज आठ ते साडेआठ हजाराच्या जवळपास नागरिकांच्या करोना चाचण्या होत आहेत. पैकी १७ ते ४० रुग्णांमध्येच करोनाचे निदान होत आहे. त्यामुळे सकारात्मक अहवालाचे प्रमाण घसरले आहे. तर राज्यात आजही रोज आठ हजारावर नवीन बाधितांची भर पडत आहे. वैद्यकीय शिक्षण खात्याच्या अहवालानुसार ३० मे २०२१ ते १८ जुलै २०२१ पर्यंत राज्यात पन्नास दिवसांत १ कोटी ५ लाख ६१ हजार २२९ संशयितांच्या चाचण्या झाल्या. त्यातील ७४ लाख २८ हजार ५२३ चाचण्या (७०.३३ टक्के) शासकीय प्रयोगशाळेत तर ३१ लाख ३२ हजार ७०६ चाचण्या (२९.६७ टक्के) खासगीत झाल्या. त्यामुळे शासकीय प्रयोगशाळेत चाचण्यांचे प्रमाण ६.२९ टक्के वाढले आहे. तर करोनाचा पहिला रुग्ण आढळलेल्या मार्च २०२० ते १८ जुलै २०२१ पर्यंत राज्यात ४ कोटी ५३ लाख ६२ हजार ५४४ संशयितांच्या चाचण्या झाल्या. त्यात शासकीयतील २ कोटी ९० लाख ५१ हजार ९१५ (६४.०४ टक्के) तर खासगीतील १ कोटी ६३ लाख १० हजार ६२९ चाचण्यांचा (३५.९६ टक्के) समावेश होता. या आकडेवारीला एका अधिकाऱ्याने नाव न देण्याच्या अटीवर दुजोरा दिला आहे.