’आकडय़ांचा घोळ कारणीभूत ’ २४ तासांत शून्य मृत्यू, १४ रुग्ण

नागपूर : जिल्ह्य़ात गेल्या २४ तासांत एकही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. १४ नवीन रुग्णांची भर पडली. परंतु, शुक्रवारी आरोग्य विभागाने आजपर्यंत नोंद न केलेले १ हजार ७६ नवीन मृत्यू, १५ हजार ३१५ रुग्ण, १४ हजार ३७ व्यक्ती करोनामुक्त झाल्याची नोंद केली. या आकडय़ांच्या घोळामुळे गुरूवारी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालात शहरात नोंदवलेली १११ सक्रिय रुग्णांची संख्या प्रत्यक्षात  तिपटीने अधिक म्हणजे ३१० असल्याचे स्पष्ट झाले.

नागपुरात करोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला होता. नोंदवलेल्या रुग्णांच्या तुलनेत प्रत्यक्षात रुग्ण व मृत्यूसंख्या जास्त होती. आरोग्य विभागाने आयसीएमआरच्या पोर्टल आणि येथील नोंदीची प्रत्यक्ष अंकेक्षण करून ही आकडेवारी शुक्रवारी वाढवल्यावर हा प्रकार स्पष्ट झाला. त्यानुसार जिल्ह्य़ात १५ हजार ३१५ अधिक रुग्ण, १ हजार ७६ अधिक मृत्यू झाले होते.  नोंदणी नसलेल्या रुग्णांपैकी १४ हजार ३७ व्यक्ती बरेही झाले.  या आकडेवारीच्या घोळानंतर शहरात सध्या २३२, ग्रामीणला ७८ असे एकूण ३१० सक्रिय रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातील गंभीर संवर्गातील ८६ रुग्ण विविध कोविड रुग्णालय वा कोविड केअर सेंटरला तर २२४ रुग्ण गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत.

दरम्यान,  मागच्या २४ तासांत शहरात १०, ग्रामीणला ४ असे एकूण १४ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या रुग्णांची संख्या ३ लाख ३९ हजार ८९०, ग्रामीण १ लाख ४६ हजार ५८, जिल्ह्य़ाबाहेरील ६ हजार ७९४ अशी एकूण ४ लाख ९२ हजार ७४२ रुग्णांवर पोहोचली.

दिवसभऱ्याच जिल्ह्य़ात एकाही रुग्णाचा मृत्यू नाही. त्यामुळे शहरातील मृत्यूसंख्या ५ हजार ८९१, ग्रामीण २ हजार ६०३, जिल्ह्य़ाबाहेरील १ हजार ६२१ अशी एकूण १० हजार ११५ इतकी आहे.  दिवसभऱ्यात शहरात ७ हजार १६४, ग्रामीणला १ हजार ४१४  चाचण्या झाल्या.

विदर्भातील तीन जिल्ह्य़ात नवीन रुग्ण नाही

२४ तासांत  विदर्भातील तीन जिल्ह्य़ांत करोनाचा एकही नवीन रुग्ण आढळला नाही.  सात जिल्ह्य़ांत ८६ रुग्ण आढळले.  विदर्भात ४ मृत्यू झाले. भंडारा, गोंदिया, अकोला असे  एकही रुग्ण न आढळलेल्या जिल्ह्य़ांची नावे आहेत. भंडारा- गोंदियात यापूर्वीही एकही रुग्ण न आढळल्याची नोंद असली तरी अकोला जिल्ह्य़ात दुसऱ्या लाटेनंतर प्रथमच एकही रुग्ण न आढळल्याची नोंद झाली.  विदर्भातील २४ तासांतील रुग्णसंख्या पुन्हा शंभराखाली म्हणजे केवळ ८६ वर आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. नागपूर जिल्ह्य़ात २४ तासांत ० रुग्णाचा मृत्यू झाला, तर १४ नवीन रुग्ण आढळले. अमरावतीत १ मृत्यू तर २१ रुग्ण, चंद्रपूरला ० मृत्यू तर १३ रुग्ण, गडचिरोलीत २ मृत्यू तर १२ रुग्ण, यवतमाळला ० मृत्यू तर ३ रुग्ण, भंडारा, गोंदिया व अकोला जिल्ह्य़ात एकही मृत्यू नसून दिवसभऱ्यात एकही नवीन रुग्ण आढळला नाही. वाशीमला ० मृत्यू तर ८ रुग्ण, बुलढाण्यात ० मृत्यू, १० रुग्ण, वर्धा जिल्ह्य़ात १ मृत्यू तर ५ नवीन रुग्ण आढळले.

करोनामुक्तांचे प्रमाण ९७.८८ टक्के

दिवसभऱ्यात शहरात १२, ग्रामीणला ५, जिल्ह्य़ाबाहेरील ० असे एकूण १७ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ३ लाख ३३ हजार ७६७, ग्रामीण १ लाख ४३ हजार ३७७, जिल्ह्य़ाबाहेरील ५ हजार १७३ अशी एकूण ४ लाख ८२ हजार ३१७ व्यक्तींवर पोहोचली आहे.  करोनामुक्तांचे प्रमाण ९७.८८ टक्के आहे.

आज लसीकरण नाही

सलग दोन दिवस शहरात लसीकरण अभियान राबविल्यानंतर लसीचा पर्याप्त साठा उपलब्ध न झाल्यामुळे उद्या रविवारी   कोणत्याही शासकीय व महापालिका केंद्रांमध्ये लसीकरण होणार नाही, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.