रुग्ण दुप्पट होण्याचा दर १०६ दिवसांवर

नागपूर : जिल्ह्य़ात २४ तासांत करोनामुळे २३ मृत्यू झाले असून नवीन ५८८ बाधितांची भर पडली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जिल्ह्य़ातील नवीन बाधितांच्या तुलनेत करोनामुक्तांची संख्या अधिक असल्याचा क्रम गुरुवारीही कायम होता.

जिल्ह्य़ात करोनाचा वेग मंदावला आहे. गुरुवारी जिल्ह्य़ात ५८८ नवीन बाधितांची भर पडल्याने आतापर्यंत बाधितांचा आकडा ८९ हजार ८७ वर पोहोचला.  २४ तासांमध्ये २३ जण दगावले. यामुळे जिल्ह्य़ातील आजपर्यंतच्या मृत्यूचा आकडा २,८९२ वर पोहचला.

आतापर्यंत बाहेर जिल्ह्य़ातून आलेल्या ३३४ रुग्णांचा नागपुरात मृत्यू झाला आहे. करोनाबाधितांचा शहरातील दुप्पट होण्याचा दरही १०६ दिवसांवर गेला आहे. जिल्ह्यात गुरुवारी ५ हजार ६८२ चाचण्या झाल्या. सध्या जिल्ह्य़ातील सक्रिय रुग्णांची संख्या ७ हजार ३५१ असून त्यातील गृहविलगीकरणात ४ हजार ७५० रुग्ण तर शहरातील विविध रुग्णालयांत २ हजार ६०१ रुग्ण उपचार घेत आहेत.

दिवसभरात सर्वाधिक १३ मृत्यू शहरात

दिवसभरात जिल्ह्य़ातील मेयो, मेडिकलसह खासगीत झालेल्या २३ मृत्यूंपैकी सर्वाधिक १३ मृत्यू शहरातील रुग्णांचे आहेत.  ग्रामीण भागातील दोघे तर बाहेर जिल्ह्य़ातील ८ रुग्णांचा मृत्यू  झाला.

विदर्भातील मृत्यू

(१५ ऑक्टोबर)

जिल्हा                        मृत्यू

नागपूर                      २३

वर्धा                           ०२

चंद्रपूर                       ०२

गडचिरोली                ०२

यवतमाळ                  ०२

अमरावती                 ०४

अकोला                     ०१

बुलढाणा                    ०२

वाशीम                       ००

गोंदिया                      ०२

भंडारा                       ०२

एकूण                       ४२