इंदिरा गांधी रुग्णालयात महापालिकेचे ढिसाळ नियोजन; तासन्तास उभे राहिल्याने काहींची प्रकृती बिघडली

लोकसत्ता खास प्रतिनिधी

नागपूर : लसीकरणासाठी सर्वच केंद्रांवर बुधवारीही अनेकांनी गर्दी केली. गांधीनगरच्या इंदिरा गांधी रुग्णालयात महापालिकेच्या ढिसाळ नियोजनाने  तासन्तास ताटकळत रहावे लागले. काहींची प्रकृती बिघडल्याने गोंधळ उडाला. गर्दीत कुणी नकळत लक्षणे असलेला करोनाग्रस्त असेल तर त्यामुळे इतरांमध्ये विषाणूचे संक्रमण होण्याचा धोका आहे.

इंदिरा गांधी रुग्णालयात सुमारे दोनशे जण उभे असल्याने नंतर आलेल्यांना प्रवेशद्वारावरच रोखले गेले. त्यानंतरही आत असलेल्या संख्येहून दुप्पट संख्येने वृद्ध रस्त्यांवर थांबले. गर्दीमुळे येथे वाहतूक कोंडीही झाली. त्यामुळे काही वृद्धांची प्रकृती  बिघडल्याचे उपस्थितांचे म्हणणे आहे. येथे  सुविधा नसल्याचे बघत  लोकांनी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला. या गोंधळात काहींची लसीकरणाची वेळ चुकली. पोलिसांनी वेळीच धाव घेत येथे बंदोबस्त वाढवल्याने अनुचित प्रकार टळला. शहरात १४४ धारा लागू असल्याने पाचहून अधिक व्यक्तींना एकत्र एकत्र येता येत नाही.

शहरात सुमारे ८ लाखाहून अधिक व्यक्तींना वर्षभर लस देणार असून तुम्ही गर्दी करू नका, काही दिवसांनीही लस दिली जाणार आहे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. बुधवारीही कोविन अ‍ॅपमध्ये नोंदणी करताना अनेकांना त्रास झाला, वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याने परतावे लागले.  दुपारनंतर येथे मंडप टाकण्यात आल्याची माहिती एका उपस्थिताने दिली.

वृद्धांसह इतर आजाराचे रुग्ण जोखमेच्या गटात

६० वर्षांवरील वृद्धांसह विविध आजार असलेल्या व्यक्तींमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून वेळोवेळी या गटातील व्यक्तींनी काळजी घेण्याबाबत आवाहन केले गेले. परंतु गर्दीमुळे या व्यक्तींना संक्रमण होण्याची शक्यता आहे.