महेश बोकडे

गेल्या तीन महिन्यांत मुंबई आणि नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयांत पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या.  नैराश्येतून होणाऱ्या अशा आत्महत्या टाळण्यासाठी यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनाने पदव्युत्तर विद्यार्थ्यांना इतर विषयातील शिक्षकांकडून समुपदेशनाचा  प्रकल्प सुरू केला आहे. हे शिक्षक संबंधित विद्यार्थ्यांशी नित्याने संवाद साधून त्यांची मानसिक स्थिती जाणून घेणार आहेत.

२२ मे २०१९ रोजी मुंबईच्या नायर रुग्णालयात डॉ. पायल तडवी, तर ५ जुलै २०१९ रोजी नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे डॉ. मनयूकुमार वैद्य या दोन विद्यार्थ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. प्रत्येक वर्षी दोन ते तीन पदव्युत्तरचे विद्यार्थी आत्महत्या करत असतानाही वैद्यकीय शिक्षण खाते समुपदेशनासह ठोस काही करताना दिसत नाही. वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या या योजनेअंतर्गत पदव्युत्तरच्या ३९ विद्यार्थ्यांची जबाबदारी २० शिक्षकांवर सोपवण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी पालकत्व समिती स्थापन करण्यात आली असून त्यात  तीन समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. यात शिक्षकाला महिन्यातून किमान एक वेळा संबंधित विद्यार्थ्यांशी संवाद साधायचा आहे. त्यात शिक्षण, आरोग्य, वसतिगृहातील अडचणींसह इतर माहिती विचारायची आहे. सोबत या वर्गातील हजर-गैरहजेरीसह इतरही वागणुकीवर लक्ष ठेवायचे आहे. त्यात थोडाही संशय येताच तातडीने समितीच्या समन्वयकांना सूचित करायचे आहे. पालक शिक्षकांना एकही विद्यार्थी थोडय़ाही दडपणात दिसताच त्याच्यावर समुपदेशनासह इतरही उपाय केले जातील.

पालकांनाही पत्र

रुग्णालय प्रशासनाने प्रत्येक पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या पालकांना पत्र लिहिले आहे. त्यांचा पाल्य मानसिक तणावात दिसत असल्यास तातडीने प्रशासनाला कळवण्याची विनंती करण्यात आली आहे.

महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे पालकत्व प्रशासनाकडे असते. या विद्यार्थ्यांचे सुख-दु:ख प्रशासनाला कळायला हवे. त्यातून नैराश्येचे वेळीच निदान करून त्याला टोकाचे पाऊस उचलण्यापासून रोखता येते. त्यासाठी समुपदेशनाचा प्रयोग सुरू केला आहे. यातून प्रशासनाच्याही काही चुका असल्यास त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल.

– डॉ. मनीष श्रीगिरीवार, अधिष्ठाता, वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यवतमाळ.