पोलिसांच्या चुकीमुळे आरोपीला जामीन

नागपूर : एका खुनाच्या गुन्ह्य़ात पोलिसांनी शस्त्रावरील बोटांचे ठसेच घेतले नाही. त्याचा फायदा आरोपीला मिळाला व उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्याला जामीन मंजूर केला. मात्र, तपास अधिकारी व पोलीस अधीक्षकांना या चुकीबद्दल स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिले.  योगेश दिगंबर तायडे रा. मलकापूर असे आरोपीचे नाव आहे.

३१ डिसेंबर २०१७ ला सकाळी योगेशचा त्याच्या पत्नीसोबत वाद झाला. यात त्याने आपल्या पत्नीला मारहाण केली व गळ्यावरील जखमेमुळे तिचा मृत्यू झाला. या प्रकरणात मलकापूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून योगेश, त्याचे वडील प्रल्हाद व आई निर्मला यांना आरोपी केले.

पोलिसांनी आरोपींचे कपडे व रक्ताचे नमुने घेतले. मात्र, घटनास्थळावरील शस्त्रावर असलेले बोटांचे ठसे घेतले नाही. त्यामुळे आरोपींच्या बोटांच्या ठशांसोबत मिळवण्यासाठी शस्त्रावरील ठसे पोलिसांकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे आतापर्यंत न्यायालयाने निर्मला यांना व प्रल्हाद यांना जामीन मिळाला तर योगेशनेही जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला. त्याच्या अर्जावर न्या. रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला. मात्र, ही अक्षम्य चूक असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तपास अधिकारी व बुलढाणा पोलीस अधीक्षकांना २३ जुलैपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिले. आरोपीतर्फे अ‍ॅड. संग्राम सिरपूरकर यांनी बाजू मांडली.