24 October 2020

News Flash

Coronavirus : करोना चाचणी आता दारात!

चाचण्या वाढवण्यासाठी महापालिकेची युक्ती

प्रत्येक झोनमध्ये ‘आपली बस’ फिरणार; चाचण्या वाढवण्यासाठी महापालिकेची युक्ती

नागपूर : करोनाला पायबंद घालण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवण्याची नितांत गरज असताना व लाख प्रयत्नाअंतीही नागरिक चाचणी केंद्रांवर येत नसल्याने आता थेट लोकांच्या दारातच चाचणीची सुविधा महापालिकेने उपलब्ध करून दिली आहे. शहरातील दहा झोनमध्ये ‘आपली बस’च्या रूपात हे ‘फिरते करोना चाचणी केंद्र’ तयार करून  शहर बसचा उपयोग करण्यात आला असून  शहर बसचा उपयोग चाचण्यांसाठी करणारी नागपूर महारपालिका ही पहिली महापालिका ठरली आहे.

या बसमध्ये एकावेळी दोघांची चाचणी केली जाणार आहे. यासाठी प्रत्येक बसमध्ये दोन डॉक्टर, एक  परिचारिका आणि एक स्वच्छता कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. बसमधून रुग्ण आणि डॉक्टरांचा प्रत्यक्ष संपर्क न येता चाचणी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

बसमध्ये मुख्यत: आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. त्यामुळे आता चाचणी केंद्रावर तासन्तास थांबावे लागणार नाही. चाचणी झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी  अहवाल मिळणार आहे.

रेमडेसिवीरचा सरसकट वापर 

करोनाबाधितांवर उपचार करताना काही रुग्णालयात सरसकट पहिल्या टप्प्यातच रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर करीत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्यांच्या नागपूर दौऱ्यातील आढावा बैठकीत  या मुद्यावर चर्चा के ली व सर्वसंबंधितांना असे न करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर अन्न व औषध खात्याचे मंत्री राजेंद्र शिंगणे  यांनी हे इंजेक्शन उपचाराच्या कोणत्या टप्प्यात वापरायचे याबाबत आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे स्पष्ट  के ले. रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्यास त्याला रेमडेसिवीर इंजेक्शन दिले जाते.  मधल्या काळात या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने ते बाजारात चढय़ा दराने विकले  जात होते.  नागपुरात करोनाची साथ जोरात असल्याने बहुतांश  रुग्णालयात  रुग्ण दाखल होताच  त्याला पहिल्या टप्प्यातच या  इंजेक्शन दिले जात होते. त्यामुळे त्याची मागणी वाढली होती. या सर्व मुद्यांचा ऊहापोह  आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आढावा बैठकीतही  झाला होता.  त्यानंतर राज्याचे अन्न व औषध खात्याचे मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी मुंबईत  उत्पादक व वितराकांची बैठक घेऊन इंजेक्शन उपलब्धतेबाबत आढावा घेतला. सप्टेंबरअखेपर्यंत १,५०,२५६ इंजेक्शन उपलब्ध होणार असल्याची माहिती उत्पादकांनी या बैठकीत दिली होती. करोना उपचारादरम्यान सरसकट सर्वच रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन न देता रुग्णाला कोणत्या टप्प्यात त्याचा वापर करावा, याबाबत नियम ठरवून द्यावे,  यासाठी आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचेही डॉ. शिंगणे यांनी स्पष्ट के ले होते. त्यानंतर आता पुरवठा सुरळीत होण्याची चिन्हे आहेत.

सिटी स्कॅनच्या शुल्क निर्धारणाविरुद्ध डॉक्टर उच्च न्यायालयात सिटी स्कॅनचे शुल्क निर्धारित करण्याच्या निर्णयाला द इंडियन रेडिऑलॉजिस्ट अ‍ॅण्ड इमेजिंग असोसिएशनच्या डॉक्टरांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. या याचिकेवर न्यायालयात ६ ऑक्टोबरला सुनावणी होईल. राज्यात प्रामुख्याने १६ ते ६४ स्लाईस क्षमतेच्या सिटी स्कॅन मशीनचा प्रामुख्याने वापर करण्यात येते. क्षमतेनुसार सिटी स्कॅनची दरे निश्चित करण्यात येतात. १६ स्लाईसपेक्षा कमी क्षमतेच्या मशीनद्वारा स्कॅन करण्यासाठी दोन हजार रुपये, १६ ते ६४ स्लाईनच्या मशीनद्वारा स्कॅनकरिता २ हजार ५०० रुपये आणि ६४ स्लाईसपेक्षा अधिक क्षमतेच्या मशीनद्वारा स्कॅन करण्यासाठी ३ हजार रुपये शुल्क आकारले जाते. यात सिटी स्कॅन, तपासणी अहवाल, वैयक्तिक सुरक्षा संच, निर्जंतुकीकरण आणि जीएसटी आदी शुल्कांचा समावेश आहे. अशावेळी सिटी स्कॅनचे दर निश्चित करण्यापूर्वी राज्य सरकारने संघटनेच्या एक प्रतिनिधीचे मत घेणे आवश्यक होते. पण, राज्य सरकारने १५ सप्टेंबरला एक समिती नेमली. त्यात संघटनेचा एकही प्रतिनिधी नव्हता. या समितीच्या अहवालानुसार २४ सप्टेंबरला राज्य सरकारने एका शासन निर्णयाद्वारा सिटी स्कॅनचे शुल्क निर्धारित केले. हा निर्णय घेण्यापूर्वी सरकारने क्ष-किरण तज्ज्ञ डॉक्टरांची बाजू जाणून घेतली नाही. त्यामुळे सरकारच्या निर्णयावर स्थगिती देण्याची विनंती याचिकाकर्त्यांनी केली. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. कार्तिक शुकूल यांनी बाजू मांडली.

शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र धोका कमी झाला नाही. त्यामुळे चाचण्यांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. अनेक लोक  आजार, वृद्धापकाळ किंवा अन्य कारणाने चाचणी केंद्रावर  जाऊ शकत नाही, अशांसाठी या करोना चाचणी बसेस फायदेशीर ठरणार आहेत. यासाठी दहा मोबाईल फिरते करोना केंद्र तयार करण्यात आले आहे. 

– संदीप जोशी, महापौर.

राज्य शासनाच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियानाअंतर्गत आता शहरातील नागरिकांना त्यांच्या घराजवळ  करोना चाचणी करता यावी यासाठी या करोना चाचणी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिकेकडे आधी दोन फिरते चाचणी केंद्र उपलब्ध होते, आता परिवहन विभागाच्या सहकार्याने यामध्ये १२ मोबाईल फिरत्या केंद्रांची भर पडली आहे. सध्या प्रत्येक झोनमध्ये एक बस उपलब्ध करून देण्यात आली असून नागरिकांच्या सुविधेनुसार पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

– राधाकृष्ण बी.आयुक्त, महापालिका.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2020 12:49 am

Web Title: covid test now at the doorstep in nagpur zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 उपराजधानीला ‘क्राईम कॅपिटल’ संबोधणारे आता सत्तेत, तरीही गुन्हे वाढतेच!
2 लोकजागर : मुंढे आणि राधाकृष्णन!
3 २६ हजार विद्यार्थी आजपासून देणार एमएचटी-सीईटी
Just Now!
X