- देशभर पडसाद, व्यापारी सतर्क
- ‘मार्जिन मनी’च्या जुगाराचा खेळ
आर्थिक गुन्हे शाखा, भारतीय प्रतिभूती आणि गुंतवणूक मंडळ (सेबी)च्या नागपुरातील कारवाईचे पडसाद देशभर उमटले आहे. या कारवाईमुळे देशभरातील डब्बा व्यापारी सतर्क झाले असून उपराजधानीतील व्यापारी वर्तुळात गुरुवारपासून केवळ डब्बा व्यापाराची उलटसुलट चर्चा आहे. या शेअर बाजाराशी परिचय असलेल्यांना डब्बा व्यापाराची कल्पना असते. ‘डब्बा व्यापार’ म्हणजे ‘मार्जिन मनी’च्या जुगाराचा खेळ आहे. या कारवाईमुळे समाजातील पांढरपेशा गुन्हेगारांचा पुन्हा एकदा बुरखा फाटला आहे.
भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करणे किंवा दलाली स्वीकारण्यासाठी ‘डीमॅट’ खाते उघडणे आवश्यक आहे. लोकांचे पैसे शेअर बाजारात गुंतविण्याचे काम करणाऱ्या दलाली कंपन्यांना प्रथम सेबीकडे नोंदणी करून अधिकृत परवाना घेणे आवश्यक आहे. आज कोटॅक महिंद्रासारख्या अनेक बँका व कंपन्या हे काम करतात. त्याशिवाय प्रत्येक बडय़ा शहरांमध्ये त्यांचे अधिकृत शेअर ब्रोकरही आहेत. बँका आणि अधिकृत शेअर ब्रोकर वैध मार्गाने शेअर बाजारात गुंतवणूक करतात. शेअर बाजारात होणाऱ्या गुंतवणुकीवर सरकार कर आकारते. सर्व व्यवहार सेबीच्या देखरेखीत होतात. शेअर बाजारात अधिकृतपणे गुंतवणूक करण्यासाठी तुमच्या डीमॅट खात्यात पैसे असणे आवश्यक असते. त्याशिवाय गुंतवणूक करता येऊ शकत नाही. याऊलट डब्बा व्यापाराचे आहे.
या व्यापाऱ्यांचा सेबीशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसतो. ते नोंदणीकृत दलाल नसतात. त्यांच्याकडे गुंतवणूक स्वीकारण्याचा परवाना नसतो किंवा ते करही भरत नाहीत. तरीही ते शेअर बाजाराशी समांतर व्यवस्था निर्माण करून गुंतवणूक स्वीकारतात. या व्यापाऱ्यांकडे गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारास ‘डीमॅट’सारखे कोणतेही खाते उडण्याची आवश्यकता नाही. कोणत्याही प्रकारची हमी रक्कम आगाऊ देण्याची आवश्यकता नाही. या व्यापारातील सर्व व्यवहार तोंडी आणि टेलिफोनिक स्वरूपात होतात.
डब्बा व्यापारी संगणक, मोबाईलच्या माध्यमातून अनेक देशाच्या शेअर मार्केटवर एकाचवेळी लक्ष ठेवतात. त्यामुळे सोने-चांदी, दैनंदिन उपयोगाच्या वस्तू, राष्ट्रीय चलनाचे दर यावर लक्ष ठेवून असतात. मोबाईल किंवा संगणकाच्या एका स्क्रीनवर हे सर्व बघता येईल, असे सॉफ्टवेअर तयार करतात. हे सॉफ्टवेअर डब्बा व्यापाऱ्यांकडेच उपलब्ध राहते. त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांना आंतरराष्ट्रीय बाजाराची कल्पना नसते. सोने-चांदी, गहू, तांदूळ अशा दैनंदिन वस्तूंचे दर आदींचा अभ्यास करून खरेदीविक्री करतात. ही खरेदी विक्री करण्यासाठी पैशाची आवश्यकता नाही. उदा. लोमेश हा डब्बा व्यापारी आहे. राजेशला आजच्या दरानुसार १० किलो चांदी विकत घ्यायची आहे. तो लोमेशला दूरध्वनी करतो आणि आजच्या दरानुसार दहा किलो (४० रुपये किलो दराने) चांदी खरेदी करतो. या खरेदीसाठी तो लोमेशला एक रुपयाही देत नाही. मात्र, लोमेशच्या लेखी राजेशने आजच्या तारखेत दहा किलो चांदी खरेदी केली आहे. यानंतर चांदीचे दर चढणार किंवा पडणार हे राजेशला माहिती नसते. समजा, दोन दिवसांनी चांदीचे दर दोन हजारांनी पडले, तर आपले अधिक नुकसान टाळण्यासाठी राजेश पुन्हा लोमेशला दूरध्वनी करून त्याच्या नावाने नोंद असलेली चांदी बाजारात विकण्यास सांगतो. त्यावेळी चांदीचे दर दोन हजारांनी पडलेले असल्याने राजेशला एका किलोमागे २ हजारांचे नुकसान होते. जर दर चढले असते आणि राजेशने चांदी विकली असती तर त्याला फायदा झाला असता. या व्यवहारातील झालेले नुकसान किंवा फायद्याची रक्कम असते तिला डब्बा व्यापाऱ्यात ‘मार्जिन मनी’ म्हणतात. आठवडा, पंधरवडा किंवा महिन्याच्या शेवटी डब्बा व्यापारी प्रत्येक ग्राहकांच्या हिशेबाची गोळाबेरीज करून ‘मार्जिन मनी’ वसूल करतो किंवा अदा करतो. हा सर्व व्यवहार कोटय़वधींमध्ये असून प्रचलित व्यवस्थेची फसवणूक करून करण्यात येतो. या पैशाची कुठेही नोंद नसते. त्यामुळे हा सर्व पैसा काळा ठरतो. याचा फटका देशाचा अर्थव्यवस्थेला बसतो. या पैशाचा देशविघात कायवायांमध्ये दुरुपयोग होण्याची शक्यताही अधिक असते, अशी माहिती पोलीस उपायुक्त दीपाली मासिरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
फरार आरोपी
रवी ओमप्रकाश अग्रवाल, दिनेश भंवरलाल सारडा रा. कॅनाल रोड, विनय श्रीप्रकाश अग्रवाल (३१, रा. एलीमेंटस अपार्टमेंट, सूर्यनगर), अंकित ओमप्रकाश मालू (२५, रा. वाठोडा, नंदनवन), आशीष मुकुंद बजाज (३७, रा. हिवरीनगर), अभिषेक मुकुंद बजाज (३४, रा. हिवरीनगर), कन्हैय्या उर्फ कन्नी रामचंद्र थावराणी आणि सचिन ठाकुरलाल अग्रवाल (३७, रा. सतनामीनगर) अशी फरार आरोपींची नावे आहेत. त्यापैकी एल-७ समूह आणि छत्तरपूर फार्मचा मालक रवी अग्रवाल हा मोठा मासा असून तो दुबईत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
देशभरात दररोज तीन लाख कोटींचा व्यवहार
डब्बा व्यापाऱ्याची श्रृंखला देशभर पसरली आहे. नागपूर हे देशाचे केंद्रबिंदू आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगढ, ओडिशा, गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्रातून नागपुरात गुंतवणूक केली जाते. याशिवाय डब्बा व्यापाऱ्यांना नागपुरातून व्यवसाय मिळतो. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात या राज्यात डब्बा व्यापार मोठय़ा प्रमाणात चालतो. या व्यापाऱ्यांतर्गत दररोज तीन लाख कोटींची उलाढाल होते. मात्र, त्यावर एक रुपयाही सरकारला मिळत नाही. ही प्रतिबंधित व्यवस्था असल्याने गुरुवारी आर्थिक गुन्हे शाखा आणि सेबीने नागपुरातील बारा प्रतिष्ठानांवर छापे टाकले. त्यातील दोन बंद होते. तर दहा प्रतिष्ठानांवर कारवाई करण्यात आली.
१७ संगणकांसह पाच लाख रुपये जप्त
या कारवाईत पोलिसांनी १७ संगणक, ५ लॅपटॉप, १ डीव्हीआर, ८ टीव्ही आणि अनेक पोती दस्तावेज जप्त केले आहे. याशिवाय पोलिसांनी कॅनॉल रोड येथील रहिवासी गोंविदलाल सारडा यांच्याकडून ४ लाख ४१ हजार ४४० रुपये रोख जप्त करण्यात आली. या कारवाईसाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील, पोलीस निरीक्षक जी. जे. पाटील, मदने, फुलपगारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप लांडे, अतुलकर, चौगुले, काळंगे, सानप आणि जयपूरकर यांच्या नेतृत्वात पथके तयार करण्यात आली होती. जवळपास दीडशेवर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यात समावेश होता.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
या व्यापारासाठी आरोपींनी वेगवेगळे सॉफ्टवेअर विकसित करून घेतले. या सॉफ्टवेअरच्या एका स्क्रीनवर अनेक देशांचे स्टॉक मार्केट एकाचवेळी दिसतात. अमेरिका, युके, फ्रान्स, जर्मनी अशा प्रगत देशांतील स्टॉक मार्केटचा परिणाम भारतीय स्टॉक मार्केटवर पडतो. त्या बाजारात वस्तूंच्या किमती चढणे किंवा पडण्याची माहिती डब्बा व्यापाऱ्यांना असते. तेथील मार्केट बंद झाल्यानंतर भारतीय स्टॉक मार्केट उघडतो. त्यामुळे भारतात सोन्या-चांदीसारख्या वस्तूंचे दर पडणार किंवा चढणार याची पूर्वकल्पना डब्बा व्यापाऱ्यांना असते. परंतु गुंतवणूकदारांकडून ते भारतीय बाजारपेठेनुसारच गुंतवणूक स्वीकारतात. त्यांना धोका वाटल्यास ते आपल्यापेक्षा मोठय़ा व्यापाऱ्याकडे गुंतवणूक वर्ग करून स्वत:चा फायदा करून घेतात. यात मात्र गुंतवणुकदारांची फसवणूक होते, अशी माहिती मासिरकर यांनी दिली.]
१३ जणांना अटक, ८ फरार
आर्थिक गुन्हे शाखेने डब्बा व्यापाऱ्यांवरील कारवाईत पोलिसांनी लकडगंज पोलीस ठाण्यात सहा, तहसीलमध्ये एक आणि सीताबर्डीत एक असे ८ गुन्हे दाखल केले. यात २१ जणांना आरोपी करण्यात आले असून १३ जणांना अटक करण्यात आली आहे. रमेश छोटेलाल पात्रे (३३, रा. १०१, वैशालीनगर), गोविंद भंवरलाल सारडा (४२, रा. कॅनाल रोड), कुशल किशोर लद्दड (३७, रा. रामदासपेठ), वीणा घनश्याम सारडा (५१, रा. शिवाजीनगर), प्रितेश सुरेशकुमार लखोटिया (३७, रा. २०१, शंकरनगर), अश्वीन मधुकर बोरीकर (३०, रा. दुर्गावतीनगर), विकास लक्ष्मीनारायण कुबडे (२८, रा. पाचपावली), स्वप्नील विजयराव पराते (२४, रा. शिवाजीनगर), विजय चंदुलाल गोकलानी (३४, रा. क्वेटा कॉलनी), निरज ओमप्रकाश अग्रवाल आणि निमीत किरीट मेहता अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे.
आरोपींना पोलीस कोठडी
अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना शुक्रवारी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमक्ष हजर करण्यात आले. या प्रकरणाचे धागे देश-विदेश पातळीवर जुळलेले असून आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या संगणकांमधील डेटाचा अभ्यास करून इतरांना अटक करण्यासाठी पोलीस कोठडी मागण्यात आली. न्यायदंडाधिकाऱ्यांनी सरकारचा युक्तिवाद ग्राह्य़ धरून आरोपींना सोमवापर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
गैरव्यवहार वाढीस यंत्रणाही जबाबदार
शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतविण्यासाठी सर्वसामान्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याशिवाय विविध कायदे आणि नियंत्रण यंत्रणांचे नियम अतिशय किचकट असतात. त्यामुळे सर्व प्रकारची डोकेदुखी टाळण्यासाठी आणि दोन पैसे कमविण्यासाठी व्यापारी अशा मार्गाचा अवलंब करतात. डब्बा व्यापारातील गुंतवणूक ही शेअर मार्केटमध्ये नोंद झाली तर देशाचा विकासाला मोठी चालना मिळू शकते. त्यामुळे सरकारने असा व्यापार नियमित करण्यासाठी त्यांना शेअर मार्केटशी जोडण्यासंदर्भात विचार करण्याची आवश्यकता आहे.
– संजय अग्रवाल, शेअर बाजार तज्ज्ञ