माहिती अधिकारातून तपशील उघड; संघाच्या प्रतिमा संवर्धनासाठी वापर केल्याचा आरोप

नागपूर : मनीषनगर येथील ज्येष्ठ नागरिक व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक नारायण दाभाडकर यांनी करोनाबाधित तरुणासाठी रुग्णालयातील रुग्णशय्या (बेड) सोडली नव्हती तर त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना त्यांचे जावई व इतर नातेवाईकांनीच स्वत:हून रुग्णालयातून नेले होते, असा तपशील माहिती अधिकारातून प्राप्त झाला आहे.

दरम्यान, या तपशीलाच्या आधारावर काँग्रेसचे प्रवक्ते  सचिन सावंत यांनी भाजपवर टीका के ली आहे. भाजपने दाभाडकर यांच्या मृत्यूचा वापर संघाच्या प्रतिमा संवर्धनासाठी  केल्याचा त्यांचा आरोप आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते मोहनिश जबलपुरे यांनी हा तपशील माहिती अधिकाराच्या माध्यमातून प्राप्त झाला. तो गुरुवारी  सचिन सावंत यांनी ट्विट केला. नारायणराव दाभाडकर हे २२ एप्रिलला नागपूर महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयातून घरी परतले होते.

त्यानंतर तीन दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला होता.  त्यानंतर यासंदर्भात एक पोस्ट समाजमाध्यमांवर प्रसारित झाली होती. त्यात  ‘मी आता ८४ वर्षांचा आहे. मी माझे सर्व आयुष्य जगून घेतले. मला उपचाराची गरज नाही. माझी रुग्णशय्या तुम्ही या गरजू रुग्णाला द्या आणि त्याच्यावर उपचार करा’, असे सांगून दाभाडकर घरी परतले असा उल्लेख होता. दाभाडकर यांची त्यागकथा या नावाने ही पोस्ट सर्वत्र पसरली होती. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी दाभाडकर त्यांच्या त्यागाचे कौतुक केले होते. दरम्यान, रुग्णालयानेच त्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने उलटसुटल चर्चेला तोंड फुटले होते.

आता मोहनिश जबलपुरे यांना  रुग्णालयातून प्राप्त माहितीमध्ये  दाभाडकर यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाला दिलेल्या पत्राचा समावेश आहे. त्यात  दाभाडकर यांच्या शरीरातील प्राणवायूची पातळी खालावलेली असतानाही त्यांनी रुग्णालय सोडण्याचा निर्णय का घेतला यामागचे कारण नमूद आहे. ‘रुग्णालयात व्हेंटिलेटरची सुविधा नव्हती व रुग्णाची स्थिती गंभीर असल्याने तेथील डॉक्टरांनी इतर इस्पितळात नेण्याचा सल्ला दिला होता. तेव्हा दाभाडकर यांनी व त्यांच्या जावयाने स्वत:च्या जबाबदारीवर घरी जाण्याची लेखी परवानगी मागितली’, असेही त्या पत्रातून स्पष्ट होते.

विशेष म्हणजे, या पत्रात कोणत्याही तरुणासाठी किंवा  इतर कोणासाठीही रुग्णशय्या सोडल्याचा उल्लेख नाही, याकडे सावंत यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लक्ष वेधले आहे. मृत्यूचे भांडवल करायचे नव्हते आम्हाला त्यांच्या मृत्यूचे भांडवल करायचे नाही. याआधी देखील चित्रफितीद्वारे हे स्पष्ट केले होते. भांडवल करायचे नव्हते म्हणून रुग्णालयाला दिलेल्या माहितीत आम्ही तसे काही नमूद केले नाही. परंतु आपला प्राणवायू काढून इतर कुणाला देण्यासारखा त्याग नाही. दाभाडकर समाजासाठी आदर्श आहेत.

– आसावरी कोठीवान- दाभाडकर यांची कन्या.

सावंतांना संघनिष्ठा माहीत नाही संघ स्वयंसेवकाचे कर्तृत्व आणि निष्ठेबद्दलची  कल्पना सावंत यांना नाही. संघ अशा पद्धतीचे राजकारण कधीच करत नाही.  उचलले बोट आणि केले आरोप, हे प्रकार सावंत यांनी सोडावे.

– गिरीश व्यास, प्रवक्ते, भाजप.

भाजपची अश्लाघ्य कृती दाभाडकर यांच्या मृत्यूचा वापर संघाच्या प्रतिमा संवर्धनासाठी करण्याचा अश्लाघ्य प्रकार भाजपने केला. या माहितीनंतरही  दाभाडकर यांच्याबद्दलचा आमच्या मनातील आदर कमी होणार नाही. त्यांना राजकारणात ओढणे अयोग्य आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– सचिन सावंत, प्रवक्ते, काँग्रेस</strong>