ऑनलाईन तिकीट खरेदी करताना ग्राहकांच्या बँक खात्यातून काही क्षणात रक्कम वळती होते, परंतु तिकीट रद्द केल्यास रक्कम परत बँक खात्यात जमा होण्यास विलंब लागतो. रेल्वेने ऑनलाईन तिकीट विक्रीची जबाबदारी इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनकडे दिली आहे. तिकीट खिडकीपुढे तासन्तास उभे राहण्यापेक्षा ऑनलाईन तिकीट खरेदी करण्याकडे प्रवाशांचा कल वाढला आहे. यामुळे लोकांचा त्रास कमी झाला असला तरी काही प्रकारांमुळे ही सोय त्रासदायकही ठरू लागली आहे. ई-तिकीट खरेदी केल्यानंतर डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून प्रवाशांच्या बँक खात्यातून ताबडतोब रक्कम कापली जाते. रक्कम स्थानांतरित झाल्याचा लघुसंदेश येईस्तोवर तिकीट मिळत नाही. मात्र, ऐनवेळी तिकीट रद्द केल्यास त्याची रक्कम त्याच तत्परतेने परत केली जात नाही. यासंदर्भात अनेकदा तक्रारी करण्यात आल्या, पण परिस्थिती सुधारली नाही.

यासंदर्भात नीलेश देशपांडे यांचा अनुभव बोलका आहे. ते म्हणाले की, नागपूर ते पुणे प्रवासाचे तिकीट २ जानेवारी २०१८ ला खरेदी केले होते. ३ जानेवारीला ते रद्द केले. १३ दिवस झाले तरी बँक खात्यात रक्कम जमा झाली नाही.

ग्राहकांना विलंब शुल्क द्या

रेल्वेचे तिकीट रद्द केल्यावर आवश्यक ती शुल्क कपात करून उर्वरित रक्कम प्रवाशाच्या खात्यात तातडीने जमा व्हायला हवी, या प्रक्रियेला विलंब झाल्यास रेल्वेने त्या रकमेवर व्याज द्यावे, अन्यथा तिकीट रद्द करण्याचे शुल्क आकारू नये, असे भारतीय यात्री केंद्राचे सचिव बसंत शुक्ला म्हणाले.

नोटबंदी काळातील रक्कम अद्याप मिळाली नाही

नोटबंदीनंतर पाच हजार किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचे तिकीट रद्द केल्यास रक्कम थेट परत केली जात नाही. त्यासाठी संबंधितांकडून अर्ज भरवून घेतले जातात आणि पत्त्यावर रक्कम पाठवली जाते, परंतु नोटबंदीच्या काळात तिकीट रद्द केलेल्या अनेक ग्राहकांना अजून त्यांची रक्कम परत मिळाली नाही. नोव्हेंबर २०१६ मध्ये रद्द केलेल्या तिकिटांची रक्कम २०१७ च्या डिसेंबरमध्ये परत मिळाली आहे, असे आनंद कांबळे म्हणाले.

आयआरसीटीसीचे संपूर्ण काम ऑनलाईन आहे. त्यामुळे विलंब होण्यास काहीच कारण नाही. आरआयसीटीसीकडे तिकीट रद्द करण्याची सूचना प्राप्त होताच दुसऱ्याच दिवशी संबंधित बँकेकडे रक्कम पाठवली जाते. काही बँकांमध्ये अजूनही तांत्रिक अडचणी आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास विलंब होते. आयआरसीटीसी रद्द झालेल्या तिकिटाची रक्कम आपल्याकडे २४ तासांपेक्षा अधिक काळ ठेवत नाही.

-सिद्धार्थ सिंग, जनसंपर्क अधिकारी, आयआरसीटीसी.