विकास कामाचा फटका; महापालिका-पोलिसांमध्ये समन्वय नाही

नागपूर : शहरात सर्वत्र विकास कामे सुरू आहेत. परंतु त्यात नियोजनाचा अभाव असल्याने त्याचा फटका नागरिकांना बसत आहे.  हाच अनुभव सध्या अंबाझरी लेआऊट, डागा लेआऊट आणि गांधीनगर निवासी घेत आहेत. महापालिका-पोलीस अधिकाऱ्यांमधील नियोजनशून्यतेमुळे नागरिकांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत आहे.  रस्त्यांच्या बांधकामांना परवानगी देताना महापालिकेकडून परिसरातील वाहतूक व्यवस्था किंवा  स्थानिक लोकांना भविष्यात भेडसावणाऱ्या समस्यांचा अजिबात विचार करण्यात येत नाही. महापालिकेच्या या गलथान कारभारामुळे उपराजधानीकर संतापले आहेत. पण, शहरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानणारा वर्ग अधिक असल्याने महापालिकेचा हा जाच सहन केला जात आहे.

सध्या अंबाझरी लेआऊट, डागा लेआऊट व गांधीनगर परिसरात मेट्रोचे बांधकाम सुरू आहे. त्यात पुन्हा महापालिकेने सिमेंट रस्त्यांचे बांधकाम व भूमिगत वीज वाहिनीच्या खोदकामालाही परवानगी दिली आहे. या परिसराच्या चारही बाजूने कंत्राटदारांनी खोदकाम करून ठेवले आहे. सिमेंट रस्त्यांच्या बांधकामांसाठी निम्मा रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक रहिवासी व हिंगणा मार्गाने ये-जा करणाऱ्यांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे.

स्थानिक लोकांना  वाहन रस्त्यावर आणण्यासाठी जिकरीचे प्रयत्न करावे लागत आहेत. वाहतूक पोलीस वाहतूक व्यवस्था सांभाळण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण, महापालिका वाहतूक पोलिसांशी समन्वय न साधताच परस्पर खोदकामांना परवानगी देत असल्याने वाहतूक कोंडीला सांभाळण्याचा अतिरिक्त ताण पोलिसांवर येत  आहे.

वीज खांब की अपघाताचे सापळे?

अंबाझरी उद्यान ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ शैक्षणिक परिसरादरम्यानच्या रस्त्यावर सिमेंट रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे. या सिमेंट रस्त्याच्या एका बाजूने वाहतूक सुरू असून विजेचे खांब रस्त्याच्या मधोमध आले आहेत. त्यामुळे रात्री भरधाव वाहने अनियंत्रित झाल्यास वीज खांबावर धडकून मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. या वीज खांबांमुळे दुतर्फा जाणारी दोन वाहने एकाचवेळी निघू शकत नाही. असा विकास आम्हाला नको, असे म्हणण्याची वेळ आता आली आहे.

लवकर रस्ते  बांधण्याचा प्रयत्न

अंबाझरी परिसरातील रस्त्यांचे बांधकाम महामेट्रोकडून करण्यात येत आहे.  रस्त्यावर खोदकाम करताना त्यांनी पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे. तसे केले नसल्यास विभागामर्फत योग्य ती कारवाई करून संबंधितांना ताबडतोब रस्ते बांधण्यासाठी सांगण्यात येईल. – राधाकृष्णन बी., आयुक्त,  महापालिका.