गोंदिया जिल्ह्यातील पर्यटनस्थळावर आधारित असलेल्या ‘गोंदिया इसेन्स ऑफ इंडिया’ आणि राज्यात केवळ गोंदिया जिल्ह्यातच आढळणाऱ्या दुर्मिळ अशा सारस पक्ष्यांवरील ‘सारस वैभव गोंदियाचे’ या दोन्ही माहितीपटाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिक्षाभूमी येथील सभागृहात करण्यात आले.

याप्रसंगी पालकमंत्री राजकुमार बडोले, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी आदींसह अन्य अधिकारी उपस्थित होते.

पूर्व विभागातील गोंदिया जिल्हा तलावांचा व धानाचे कोठार म्हणून ओळखला जातो. हा जिल्हा वनराई व वन्यजीवांनी समृद्ध असून जिल्ह्यात नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्प, हाजरा फॉल, चुलबंद, बोदलकसा, मांडोदेवी यासह अनेक पर्यटन व तीर्थस्थळे आहेत.

या स्थळांची माहिती राज्यभर व्हावी व जास्तीतजास्त पर्यटक व वन्यजीवप्रेमी पर्यटनासाठी व सारस पक्ष्यांसह वन्यप्राण्यांना बघण्यासाठी गोंदिया जिल्ह्य़ात यावे, याकरिता पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या मार्गदर्शनातून व जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या संकल्पनेतून जिल्हा पर्यटन समितीने तयार केलेला ‘गोंदिया इसेन्स ऑफ इंडिया’ हा माहितीपट १३ मिनिटांचा आहे. यात पाहुणे कलावंत म्हणून अभिनेते डॉ. गिरीश ओक यांनीही काम केले आहे.

या जिल्ह्यातील धानाची शेती, विदेशात निर्यात होणारा उच्च प्रतीचा तांदूळ, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव प्रकल्पातील वनराई-वन्यजीव, चुलबंद, बोदलकसा, नवेगावबाध जलाशय, इटियाडोह प्रकल्प, हाजरा फॉल, तसेच जिल्ह्यातील दंडार ही लोककला, ऐतिहासिक व तीर्थक्षेत्र असलेले कचारगड, मांडोदेवी, तिबेटीयन शरणार्थी वसाहत, यासह अनेक पर्यटनस्थळांची माहिती देण्यात आली आहे.

राज्यात केवळ गोंदियातच आढळणाऱ्या दुर्मिळ व सुंदर दिसणाऱ्या सारस पक्ष्यांसह जिल्ह्यातील मालगुजारी तलावांवर येणाऱ्या स्थलांतरित व विदेशी पक्ष्यांवर जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या ‘सारस वैभव गोंदियाचे’ या वृत्तपटात सारस पक्ष्यांचे सौंदर्य, प्रेमाचे प्रतीक म्हणून दिलेली उपमा, ऐतिहासिक काळापासून आदिवासी बांधवांमध्ये सारस पक्ष्यांचे करण्यात येत असलेले पूजन, सारस महोत्सव, सारस संवर्धनासाठी उभी झालेली लोकचळवळ, पर्यटन आदींचे वर्णन करण्यात आले आहे.

या माहितीपट व वृत्तपटाच्या प्रकाशनप्रसंगी नागपूर विभागातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकाऱ्यांसह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.