राज्यात भाजपच्या जागा वाढल्या

नागपूर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजप पक्षश्रेष्ठींनी बिहार निवडणुकीच्या संदर्भात दाखवलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरवला आहे. या राज्यात भाजपच्या जागा वाढल्या असून तो दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून पुढे आला आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी फडणवीस यांची बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रभारीपदी नियुक्ती केली होती. इतक्या मोठय़ा आणि जातीय राजकारण  प्रभावी असलेल्या राज्याच्या प्रभारीपदाची जबाबदारी फडणवीस यांच्यावर टाकण्यात आल्यावर पक्षातीलच नव्हे तर इतर पक्षांच्या नेत्यांच्याही भुवया उंचावल्या होत्या. मात्र फडणवीस यांच्या पाठीशी  २०१९ मध्ये झालेल्या  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या नियोजनाचा अनुभव होता. या निवडणुकीतील सर्व सूत्रे त्यांनी एकहाती यशस्वीपणे सांभाळली होती. त्याच आधारावर त्यांनी आपल्या अभ्यासू वृत्तीचा परिचय देत राज्याच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील राजकारणाचा सखोल अभ्यास करून व्यूहरचना आखली.

रालोआमधील घटक पक्षांमध्ये कोणतीही नाराजी निर्माण होऊ न देता जागा वाटपासारखा अतिशय अवघड प्रश्न सहज सोडवला. त्यामुळे पहिली लढाई त्यांनी तेथेच जिंकली होती. त्यानंतर उमेदवार ठरवताना आणि प्रचाराची आखणी करताना त्यांनी केलेले नियोजन यशस्वी ठरले. फडणवीस २१ दिवस बिहारमध्ये होते.

या काळात त्यांनी काही प्रचारसभाही घेतल्या. पण यादरम्यान त्यांना करोनाची बाधा झाल्याने मुंबईला परत यावे लागले. करोनावर मात केल्यानंतरही ते बिहारमधील नेत्यांच्या संपर्कात होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पक्षाच्या इतर नेत्यांच्या सभा आयोजित करण्यातही त्यांचा सहभाग होता.

निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेत संघटनात्मक कौशल्य पणाला लावून त्यांनी बिहारमधील  सत्ता कायम राखण्यात यश मिळवले. तसेच पक्षाच्या जागाही वाढल्या. त्यामुळे पक्षात राष्ट्रीय पातळीवर तसेच राज्यातही त्यांचे राजकीय वजन वाढले आहे.