राज्यात परतण्याची शक्यता फेटाळली

राज्यात सत्तास्थापनेबाबत निर्माण झालेला तिढा लवकरच सुटेल आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युतीचे सरकार येईल, असा विश्वास भाजपनेते आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी येथे व्यक्त केला.

नागपुरात एका कार्यक्रमासाठी गडकरी आले असता विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील सत्तास्थापनेच्या तिढय़ासंदर्भात त्यांना विचारले असता ते म्हणाले की, राज्यात भाजप-शिवसेनेला जनादेश मिळाला आहे. सत्तास्थापनेबाबत लकरच निर्णय होईल. भाजपने देवेंद्र फडणवीस यांना नेता म्हणून निवडले असून त्यांच्याच नेतृत्वाखाली राज्यात सत्ता स्थापन व्हायला हवी. भाजपला १०५ जागा मिळाल्या आहेत. युतीच्या सूत्राप्रमाणे ज्या पक्षाने जास्त जागा जिंकल्या आहेत, त्यांचाच मुख्यमंत्री व्हायला हवा, असे गडकरी म्हणाले.

शिवसेनेशी सुरू असलेल्या वादात संघ मध्यस्थी करणार का, असा सवाल गडकरी यांना विचारला असता या प्रक्रियेत संघाचा कोणताही संबंध नाही व तो जोडलाही जाऊ नये. या प्रकरणात सर्व निर्णय भाजपच घेतो आणि महाराष्ट्रातसुद्धा भाजपच निर्णय घेणार असून त्याला शिवसेना सहकार्य करेल, असे गडकरी यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्रीपदासाठी आपलेही नाव चर्चेत असल्याचे त्यांना विचारले असता मी दिल्लीत आहे. महाराष्ट्रात परत येण्याचा प्रश्नच नाही, असे त्यांनी उत्तर दिले.

भाजपला १०५ जागा मिळाल्या आहेत. युतीच्या सूत्राप्रमाणे ज्या पक्षाने जास्त जागा जिंकल्या त्याचाच मुख्यमंत्री व्हायला हवा.

– नितीन गडकरी, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री