• शैलेश बलकवडे यांच्या बदलीमुळे वाद चव्हाटय़ावर
  • यादव-शर्मा जोडगोळीवर अनेकांची नाराजी

शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी असणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्यांमध्येच कामावरून कलगीतुरा रंगला आहे. शैलेश बलकवडे यांच्या बदलीमुळे हा कलगीतुरा पुन्हा चव्हाटय़ावर आला आहे.

गुन्हेगारीची राजधानी अशी ओळख पुसून काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरात आयपीएस अधिकाऱ्यांची फौज पाठविली. आज नागपुरात मुंबई वगळता इतर शहरांच्या तुलनेत सर्वाधिक आयपीएस अधिकारी आहेत. या तरुण आयपीएस अधिकाऱ्यांवर शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान आहे. परंतु, कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांमध्येच चांगल्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळण्यावरून कलगीतुरा रंगला आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त रंजनकुमार शर्मा हे पोलीस आयुक्त एस. पी. यादव यांच्या जवळचे अधिकारी समजले जातात. शर्मा यांच्या मार्गदर्शनावरूनच शहरातील अनेक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांची नेमणूक, बदली होत असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे.

शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे प्रमुख म्हणून सहपोलीस आयुक्त असतात. परंतु सहपोलीस आयुक्त राजवर्धन हे कौटुंबिक समस्यांमध्ये अडकल्याने आयुक्त आणि गुन्हे शाखा उपायुक्त यांचे मधुर संबंध निर्माण झाले. या संबंधांमुळे शहरातील इतर आयपीएस अधिकारी पोलीस आयुक्तांपासून दुरावल्याची चर्चा आहे. दबंग आयपीएस अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनाश कुमार यांना सर्वप्रथम परिमंडळ-१ मधून परिमंडळ-३ मध्ये हलविण्यात आले. आता त्यांना परिमंडळ-५ मध्ये बसविण्यात आले. परिमंडळ-५ मध्ये येणारा भाग बहुतांश ग्रामीण भाग असून जाणीवपूर्णक अभिनाश कुमार यांना शहराबाहेर हाकलण्यात आल्याचे दबक्या आवाजात बोलले जाते. तर प्रामाणिक अधिकारी ईशू सिंधू यांची नांगी ठेचून त्यांना परिमंडळ-४ मध्येच मर्यादित करण्यात आले. तर नागालॅंड कॅडरमधून प्रतिनियुक्तीवर आलेल्या दीपाली मासिरकर यांना आर्थिक गुन्हे शाखेतून परिमंडळ-१ मध्ये टाकण्यात आले. महाराष्ट्र सेवेतील पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांच्या बदलीमध्ये रिक्त झालेल्या परिमंडळ-२ मध्ये आयपीएस शैलेश बलकवडे यांना पाठविण्यात आले.

गेल्या काही दिवसांपूर्वीच बलकवडे यांची परिमंडळ-२मध्ये बदली करण्यात आली होती. परंतु भरत तांगडे यांची बदली झाल्यानंतर बलकवडे यांना मुख्यालय देण्यात आले आणि परिमंडळ-२ ची जबाबदारी नव्याने आलेले पोलीस उपायुक्त रवींद्र परदेशी यांच्याकडे सोपविण्यात आली. परिमंडळ-१ मध्ये बलकवडे यांनी उल्लेखनीय काम केले. त्यांच्या काळात परिमंडळ-१ अंतर्गत जवळपास दहा टोळयांविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. अशात बलकवडे यांची बदली का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. तर आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त जी. श्रीधर, परिमंडळ-३ चे एम. राजकुमार, वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील आणि विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त आर. कलासागर हे अधिकारी शहरात नवीन आहेत. पोलीस आयुक्त आणि रंजनकुमार शर्मा या गोळजोडीला चांगले अधिकारी नकोत आणि त्यामुळेच चांगल्या अधिकाऱ्यांना दूर ठेवण्यात येत असल्याची चर्चा आहे.