देवेश गोंडाणे

मुख्यमंत्री दबावात निर्णय घेत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप; स्थगितीला दीड महिना उलटूनही कुठलीच हालचाल नाही

मराठा समाजातील संघटनांनी आंदोलनाचा इशारा देताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा स्थगित केल्या. याला आता दीड महिना उलटूनही आयोगाने परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. सरकारचा हा राजकीय डाव असून मुख्यमंत्री एका समाजाच्या दबावात निर्णय घेत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे.

राज्य लोकसेवा आयोगाकडून २०० पदांच्या परीक्षेसाठी राज्यातील २ लाख ६२ हजार विद्यार्थ्यांनी  नोंदणी केली असून ते वर्षभरापासून परीक्षेची तयारी करीत आहेत. त्यासाठी आर्थिक ओढताणही सहन करीत आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने सरकार करोनाचे कारण पुढे करून परीक्षा लांबणीवर टाकत आहे. सरकारने ११ ऑक्टोबरला होणारी परीक्षा एका दिवसाआधी स्थगित केली. याला दीड महिना उलटूनही आयोगाने अद्याप परीक्षेची दुसरी तारीख जाहीर केलेली नाही. न्यायालयात मराठा आरक्षणाचा पेच वर्षभर सुरू राहिल्यास परीक्षाच होणार नाही का, असा सवालही केला जात आहे. परीक्षा होईल या आशने हजारो विद्यार्थी करोनाकाळातही पुणे, मुंबईत भाडय़ाच्या खोतील राहून तयारी करीत आहेत. मात्र, परीक्षेची तारीख जाहीर न झाल्याने त्यांचे संपूर्ण नियोजन बिघडले आहे. परिणामी, विद्यार्थ्यांना प्रचंड आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. सरकारने इतर समाजातील विद्यार्थ्यांच्या संयमाचा अंत  न पाहता परीक्षेची तारीख जाहीर करावी, अशी मागणी स्टुडंट राईट्स असोसिएशन ऑफ इंडियासह अनुसूचित जाती, जमाती व ओबीसी समाजातील संघटनांसह खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांनी केली आहे.

.. तर जागा सोडून तरी परीक्षा घ्या

२०० पदांसाठी होणाऱ्या भरतीसाठी २ लाख ६२ हजार उमेदवारांची नोंदणी झाली आहे. यामध्ये सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांची संख्या ४२ हजार आहे. शिवाय २०० जागांमधून आरक्षणाचा विचार केल्यास मराठा समाजाला २४ जागा मिळू शकतात.  मराठा समाजाचे आरक्षण हीच परीक्षेआड येणारी अडचण असेल तर किमान तेवढय़ा जागा सोडून तरी परीक्षा घ्यावी, अशी मागणी विद्यार्थी करीत आहेत.

निवडणुका घेता, मग परीक्षा का नाही?

मुख्यमंत्र्यांनी करोनाचे कारण देत ११ ऑक्टोबरला होणारी परीक्षा स्थगित केली होती. मात्र, नुकत्याच बिहारच्या निवडणुका पार पडल्या. शिवाय महाराष्ट्रातील चित्रपटगृहांसह आता

मंदिरेही उघडण्यात आली. पदवीधर आणि शिक्षक मतदारासंघाच्या निवडणुका होत आहेत.  निवडणुका घेता येतात तर परीक्षा का नाही, असा प्रश्न स्टुडंट राईट्स असोसिएशन ऑफ इंडियाचे उमेश कोरराम यांनी उपस्थित केला.

विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये ही आमचीही भूमिका आहे. मात्र, सरकारने योग्य तो निर्णय घेऊन विद्यार्थ्यांमधील संभ्रम दूर करीत परीक्षा घ्यायला हव्यात.

– अनुप देशमुख, मराठा विद्यार्थी परिषद.

परीक्षेच्या पुढील तारखेसंदर्भात अद्यापतरी निर्णय झालेला नाही. मात्र, विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरू ठेवावा. लवकरच नवीन तारीख कळवली जाईल.

– प्रदीपकुमार, सचिव, राज्य लोकसेवा आयोग.