न्या. हक यांचे मुख्यालय बदलण्याला विरोध

नागपूर : उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झका हक यांचे मुख्यालय नागपूरहून औरंगाबाद येथे बदलण्याचे पडसाद वकील वर्तुळात सातत्याने उमटतच असून या क्रमात आज सोमवारी उपराजधानीतील वकिलांनी आपल्या कोटवर पांढरी फित लावून मुख्य न्यायमूर्तीच्या निर्णयाला विरोध केला.

न्या.  हक यांची एक निष्णात वकील म्हणून ख्याती झाली. २००४ पासून त्यांचे नाव उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदासाठी विचारात घेतले जात होते. अखेर २१ जून २०१३ ला त्यांची उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली. त्यांचे मुख्यालय नागपूर खंडपीठात होते.  शिवाय निबंधक कार्यालयात एक शिस्त लावण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. कोणत्याही दबावात न येता काम करण्याची त्यांची शैली अनेकांना खटकली व काहींनी अंतर्गत राजकारणासाठी त्यांची तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा न करताच मुख्य न्यायमूर्तीनी त्यांचे मुख्यालय नागपूरहून औरंगाबाद येथे बदलण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयाला नागपुरातील वकील मंडळी जोरदार विरोध करीत असून एचसीबीएने एक ठरावही मंजूर केला. शिवाय स्वाक्षरी अभियानही राबवण्यात आले.  यानंतरही मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग हे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने सोमवारी नागपूर खंडपीठ व जिल्हा न्यायालयातील वकिलांनी आपल्या कोटवर पांढरी फित लावून निषेध नोंदवला. सकाळपासून ते दुपारी २ वाजेपर्यंत हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पाचशेवर वकील सहभागी झाले होते. मुख्य न्यायमूर्तीच्या भूमिकेला असाच विरोध सुरू राहणार, अशी प्रतिक्रिया अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी दिली.