मंगेश राऊत

ऑटोमोटिव्ह चौक, पारडी परिसरात भयावह स्थिती

वाहतुकीसाठी चांगले रस्ते असणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. या अधिकाराकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असून या खड्डेमय रस्त्यांमुळे नागपूरकरांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. ऑटोमोटिव्ह चौक आणि पारडी परिसरातील  रिंगरोडवर हातभर खोल खड्डे आहेत. पण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्यांच्या दुरुस्तीसाठी कोणतेही पावले उचलण्यात येत नाही. या खड्डय़ांमुळे परिसरात अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

शहराच्या सर्वच भागात मेट्रो, सिमेंट रस्ते, उड्डाणपुलांचे बांधकाम सुरू आहे. विकास कामाला कोणाचाही विरोध नाही. पण, या रस्त्यांचे बांधकाम करताना पर्यायी रस्ता सुरळीत करण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची असते. कंत्राटदार मात्र पर्यायी रस्त्यांची दुरुस्ती करीत नाही. ऑटोमोटिव्ह चौक परिसरापासून कामठीकडे जाणाऱ्या रस्त्यावर रस्त्याचे काम सुरू आहे. शिवाय चौकात जडवाहतूक मोठय़ा प्रमाणात होत असते. ऑटोमोटिव्ह चौकातून राणी दुर्गावती चौकाकडे जाणाऱ्या दुसऱ्या रस्त्यावरही जवळपास अर्धा कि.मी.चा रस्ता खड्डेमय आहे. या खड्डय़ांमुळे मालवाहक ट्रक कधी उलटेल सांगता येत नाही.  दुसरीकडे पारडी ते भंडारा मार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने रस्त्यावर खड्डे पडले आहेत.

फुटाळा-अंबाझरी मार्गाची दुरवस्था

फुटाळा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शैक्षणिक परिसर ते अंबाझरी तलाव यांना जोडणारा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येत असून गेल्या दोन वर्षांपासून हा रस्ता पूर्णपणे उखळला आहे. या रस्त्यांवरून दुचाकी चालवणे अतिशय दिव्य कार्य होऊन बसले आहे.

उड्डाण पुलावरच एकाचा मृत्यू

यशोधरानगर ते कळमना रिंगरोडवर असलेल्या उड्डाण पुलाच्या एका बाजूच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे उड्डाण पुलाच्या दुसऱ्या बाजूने दुतर्फा वाहतूक सुरू आहे. पण, उड्डाण पुलाची दुरुस्ती करताना त्या ठिकाणी वाहतूक स्वयंसेवक न नेमल्याने २८ डिसेंबर २०१८ ला दुपारच्या सुमारास एका ट्रकने मोहम्मद आबीद अंसारी मोहम्मद जमाल अंसारी (२४) रा. कुंदनलल गुप्तानगर यांना चिरडले. त्या ठिकाणी वाहतूक स्वयंसेवक असता तर कदाचित हा अपघात टाळता आला असता.

रिंगरोड सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येतो. ऑटोमोटिव्ह चौक, पारडी परिसरातील रस्त्यांची स्वत: पाहणी करून रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल. विद्यापीठ कॅम्पस ते अंबाझरी तलाव रस्त्याच्या दुरुस्तीचे आदेश कंत्राटदाराला देण्यात आले असून दोन ते तीन दिवसांत कामाला सुरुवात होईल. कामाला सुरुवात न झाल्यास कंत्राटदाराकडून दंड वसूल करण्यात येईल.

– विद्याधर सरदेशमुख, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.