03 December 2020

News Flash

‘शिक्षक भारती’चे काँग्रेसला सशर्त समर्थन

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी विभागातील सहा जिल्ह्यातून २ लाख ६ हजार ४५४ पदवीधर मतदारांनी नोंदणी केली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

पदवीधर मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग

नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक  जवळ येताच राजकीय घडामोडींना वेग येऊ लागला आहे. ही जागा राखण्यासाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू के ली असतानाच  काँग्रेसने मत विभाजन टाळण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांनी विभागातील विविध जिल्ह्यांचा दौरा सुरू केला आहे. काँग्रेस उमेदवार अभिजित वंजारी यांना आमदार कपिल पाटील यांच्या शिक्षक लोक भारतीने अटींवर समर्थन जाहीर के ले. या समर्थनाच्या बदल्यात काँग्रेसने २०२३ च्या शिक्षण मतदारसंघाच्या निवडणुकीत मदत करावी, अशी ही अट आहे व ती काँग्रेसने मान्य के ल्याचे शिक्षक भारतीचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र झाडे, विदर्भ प्रमुख अतुल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या निवडणुकीत शिक्षक भारतीचे किशोर वरभे यांनी माघार घेतली आहे. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे आणि अ‍ॅड. वंजारी उपस्थित होते.

नागपूरच निर्णायक भूमिका बजावणार

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी विभागातील सहा जिल्ह्यातून २ लाख ६ हजार ४५४ पदवीधर मतदारांनी नोंदणी केली आहे. सर्वाधिक मतदारांची संख्या ही नागपूर जिल्ह्यात असल्याने तेच या निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावण्याची शक्यता आहे. २०१४ च्या तुलनेत यावेळी ८१ हजार ७७९ मतदार कमी आहेत. २०१४ मध्ये २ लाख ८८ हजार २३३ मतदार होते. विभागीय आयुक्त व निवडणूक  निर्णय अधिकारी डॉ. संजीव कुमार यांनी बुधवारी पत्रपरिषदेत ही

माहिती दिली. १९  उमेदवार रिंगणात असून ३ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजतापासून कोराडी मार्गावरील मानकापूरच्या विभागीय क्रीडा संकुलात मतमोजणी होईल. मतदानासाठी ३२० केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. मतदाराकडे निवडणूक ओळखपत्र नसेल तर ओळखपत्र म्हणून आधारकार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड, केंद्र, राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खासगी औद्योगिक संस्थांचे ओळखपत्र आदीं ग्राह््य धरण्यात येईल असे संजीव कुमार म्हणाले.

 

नाराज सोलेंच्या हस्ते प्रचार कार्यालयाचे उद््घाटन

भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचार कार्यालयाचे उद््घाटन माजी आमदार आणि उमेदवारी नाकारल्यानंतर नाराज झालेल्याची चर्चा असलेले  अनिल सोेले यांच्या हस्ते करण्यात आले. सोले यांची नाराजी दूर करण्यात पक्षश्रेष्ठींना यश आले असले तरी ते प्रचारात सक्रिय होतील का, याकडे आता लक्ष लागले आहे. जोशी यांचा नामांकन अर्ज भरण्याच्यावेळी ते शेवटच्या क्षणाला थेट विभागीय आयुक्त कार्यालयात आले होते. सोले यांची नाराजी बघता ते प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाला येतील की नाही ही शंका होती. प्रचार कार्यालयाचे उद््घाटन माजी मंत्री व प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार होते. परंतु ऐन वेळेवर ते सोले यांच्या हस्ते करण्यात आले.

काँग्रेसची बाजू भक्कम -वडेट्टीवार

दुसरीकडे बहुजन समाज पार्टीने आपला अधिकृत उमेदवार जाहीर केला नाही. २०१४ च्या निवडणुकीत बसपाचे किशोर गजभिये यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. काँग्रेसचे बबनराव तायवाडे दुसऱ्या क्रमांकावर होते. यावेळी हे दोन्ही नेते काँग्रेस उमेदवाराच्या बाजूने आहेत. यासंदर्भात राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, मागील निवडणुकीत किशोर गजभिये आणि बबनराव तायवाडे यांना मिळालेल्या मतांची बेरीज केल्यास भाजपच्या विजयी उमेदवारांपेक्षा ती अधिक होते. शिवाय यावेळी अ‍ॅड. वंजारी यांनी नवीन मतदारांची नोंदणी करवून घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार निश्चितच विजयी होईल.

मुख्याध्यापकांचा प्रश्न मार्गी लावा- नितीन रोंघे

विदर्भवादी नितीन रोंघे यांनी समाजमाध्यमातून महापौर व भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांना लक्ष्य केले आहे. नागपूर महापालिकेच्या ३३ शाळांमध्ये मुख्याध्यापक नाहीत. आपल्यासारख्या कर्तबगार नेत्याच्या कारकिर्दीत असे होणे बरोबर नाही. आपण प्रचारात व्यस्त असल्यामुळे असे होत असेल कदाचित. माझी आपल्याला विनंती आहे, की आता प्रचार थोडा वेळ बाजूला ठेवा आणि  हा प्रश्न मार्गी लावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2020 2:31 am

Web Title: election nagpur division graduate constituency legislative council akp 94
Next Stories
1 शहरातील गुन्हेगारांचा ग्रामीणमध्ये हिंसाचार!
2 मुंढेंच्या काळातील निर्णय बदलण्याचा घाट
3 ‘एमपीएससी’ परीक्षा रखडल्याने असंतोष
Just Now!
X