कौटुंबिक प्रकरणात उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
नागपूर : घटस्फोटानंतर मुलगी आईसोबत राहाते हे सांगून वडिलाची जबाबदारी संपत नाही. मुलीच्या लग्नाची आर्थिक जबाबदारी वडिलाला उचलावी लागेल, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका कौटुंबिक प्रकरणात दिला.
घटस्फोटित दाम्पत्य हे नागपुरातील रहिवासी आहेत. त्यांचे १९९१ साली लग्न झाले. त्यांना दोन अपत्ये आहेत.
पुढे काही कारणांमुळे त्यांच्यात घटस्फोट झाला. पत्नीने न्यायालयात अर्ज केल्यानंतर तिला पोटगी मिळण्यास सुरुवात झाली. २०१४ साली त्यांच्या मुलीचे लग्न झाले. या लग्नासाठी या महिलेला ३ लाख रुपयांचा खर्च आला. मुलीचे वडील या नात्याने लग्नाचा अर्धा भार उचलणे अपेक्षित आहे, अशा आशयाची याचिका या महिलेने कौटुंबिक न्यायालयात दाखल केली. न्यायालयाने पतीला या लग्नाचा अर्धा खर्च करण्याचे आदेश दिले. मात्र त्याने या निर्णयाला उच्च न्यायालायात आव्हान दिले. त्यावर न्या. अतुल चांदुरकर आणि न्या. पुष्पा गनेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
उच्च न्यायालयानेसुद्धा कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवत या पुरुषाला पुढील आठ आठवडय़ांमध्ये या महिलेला ही रक्कम देण्याचे आदेश दिले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 19, 2021 12:39 am