प्राथमिक फेरीत उत्तम सादरीकरणासाठी चढाओढ

महाविद्यालयीन नाटय़विश्वातील प्रतिष्ठेच्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पध्रेच्या प्राथमिक फेरीचा पडदा उद्या उघडणार आहे. गेल्या दीड महिन्यापासून कसून तालीम केल्यानंतर आता प्राथमिक फेरीसाठी सादरीकरणाची वेळ येऊन ठेपली आहे. नागपूर केंद्रावरील विभागीय प्राथमिक फेरीची घंटा उद्या वाजणार आहे.

उत्साहाने सळसळणाऱ्या महाविद्यालयीन तरुणाईच्या नाटय़गुणांना लोकसत्ता लोकांकिकाच्या रूपाने हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत लोकसत्ता लोकांकिका या स्पर्धेने नाटय़वर्तुळात वेगळे स्थान निर्माण केले आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेत सहभागी झालेल्या अनेक कलाकारांना सिनेनाटय़ क्षेत्रात संधी मिळाली आहे.दोन महिन्यांपासून स्पर्धेविषयी महाविद्यालयांमध्ये असलेली उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

नागपूर येथे ६ आणि ७ डिसेंबरला रंगणाऱ्या प्राथमिक फेरीने स्पर्धेची सुरुवात होत आहे. नागपूर विभागाची प्राथमिक फेरी सवरेदय आश्रम, विनोबा विचार केंद्र, भोले पेट्रोल पंपजवळ येथील सभागृहात होणार आहे. प्राथमिक फेरीत उत्तम सादरीकरण करणाऱ्यांची विभागीय अंतिम फेरीसाठी सवरेत्कृष्ट ठरणारी एकांकिका मुंबईत होणाऱ्या महाअंतिम फेरीसाठी निवडली जाईल.

प्रायोजक 

लोकसत्ता आयोजित ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत ‘लोकांकिका’ स्पर्धा ‘अस्तित्व’च्या सहकार्याने पार पडणार आहे. ‘आयओसीएल’ पावर्ड बाय असलेल्या या स्पर्धेसाठी ‘मे. बी. जी. चितळे डेअरी’ आणि ‘झी टॉकीज’ असोसिएट पार्टनर आहेत. लोकांकिके च्या मंचावरील कलाकारांच्या कलागुणांना चित्रपट मालिके त संधी देणारे ‘आयरिस प्रॉडक्शन’ टॅलेंट पार्टनर आहेत.