महेश बोकडे

शहरासह राज्यातील काही भागात करोना वाढत आहे. त्यामुळे शेजारील मध्यप्रदेश, छत्तीसगडसह इतरही काही राज्यांकडून  महाराष्ट्राला लागून असलेल्या सीमांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे येथून नागपुरातील विविध खासगी रुग्णालयांत गैर करोनाचे रुग्ण उपचाराला येणे कमी झाले आहे. त्याचा फटका येथील खासगी रुग्णालयांना बसत आहे.

नागपुरात लहान-मोठी ६५० खासगी रुग्णालये असून येथे दहा ते अकरा हजार खाटा आहेत. यातील ८०० खाटा अतिदक्षता विभागातील आहेत. या सर्व रुग्णालयांची महिन्याची उलाढाल जानेवारी २०२० मध्ये ३०० कोटींच्या जवळपास होती. परंतु करोनानंतर चित्र बदलून उत्पन्न खूप घटले. ऑगस्ट- सप्टेंबर २०२० दरम्यान येथे करोनाचा उद्रेक झाल्यावर काही खासगी रुग्णालयांना करोनाग्रस्तांवर उपचाराची सक्ती केली गेली. येथील ८० टक्के खाटा  आरक्षित केल्या. सुरवातीला खासगी कोविड रुग्णालयांत बाधितांची संख्या खूप जास्त होती. त्यामुळे त्यांना लाभही झाला. नोव्हेंबर- डिसेंबर २०२० मध्ये रुग्ण कमी झाले. त्यामुळे खासगी रुग्णालयांतील उत्पन्न घटले. नागपुरात करोना कमी झाल्यावर डिसेंबर २० ते जानेवारी २०२१ दरम्यान विदर्भाच्या विविध जिल्ह्य़ांसह मध्यप्रदेश, छत्तीसगडसह इतर राज्यांतून गैर करोनाचे रुग्ण उपचाराला यायला लागले होते. परंतु पुन्हा करोनाचे रुग्ण वाढले. त्यामुळे शेजारच्या मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेश सरकारने सीमेवर निर्बंध लावणे सुरू केले. त्यामुळे दोन्ही राज्यांतील सार्वजनिक रस्ते, वाहतुकीच्या साधने  बंद आहेत. त्यामुळे तेथील रुग्णांचा नागपुरात खासगी वाहने करून येण्याचा खर्च वाढला आहे.  दुसरीकडे नागपुरातच बाधित जास्त आढळत असल्याने परराज्यातील रुग्णांमध्ये  भीतीही निर्माण झाली आहे. त्यामुळे  या दोन्ही राज्यांतील रुग्ण निम्याहून अधिकने घटले आहेत. परिणामी,  येथील रुग्णालयांची आर्थिक कोंडी होत आहे. सुमारे सवाशे कोटींनी उत्पन्न घटल्याचा अंदाज आहे.

मध्यंतरी नागपुरात करोना कमी झाल्यावर मध्यप्रदेश, छत्तीसगडचे रुग्ण यायला लागले होते. परंतु पुन्हा  करोना वाढल्याने व परराज्यांतील सीमेवरील कडक निर्बंधामुळे रुग्णांचे येणे कमी झाले आहे. परिणामी, येथील खासगी रुग्णालयांना सुमारे सवाशे कोटींचा फटका बसत आहे.’’

– डॉ. अशोक अरबट, अध्यक्ष, विदर्भ हॉस्पिटल असोसिएशन.