मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला अधिकाऱ्यांकडूनच तर ग्रहण लावण्याचा प्रयत्न होत नाही ना, असा संशय गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय प्रकल्प परिसरात वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटनानंतर व्यक्त होत आहे. नवीन वर्षांत अवघ्या एक महिन्याच्या आत या प्रकल्पात तीनदा आगी लागल्या. सोमवारी लागलेली आग तब्बल दोन तासांपासून धुमसत असताना गोरेवाडा प्रकल्पातील कुणीही अधिकारी, कर्मचारी त्याठिकाणी पोहोचले नव्हते.

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय प्रकल्प परिसरात अफ्रिकन व इंडियन सफारीचे काम वेगाने सुरू आहे. गेल्यावर्षी मुंबई येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वनविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना संपूर्ण प्रकल्प जरी शक्य नसला तरी, अफिक्रन व इंडियन सफारीचे काम डिसेंबर २०१८ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण व्हायलाच हवे, अशी ताकीद दिली होती.

मात्र, सातत्याने या परिसरात लागणारी आग गोरेवाडा प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करणारी आहे. मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी अधिकारीच गंभीर नाहीत, अशी शंका महिनाभरात चारवेळा लागलेल्या आगीनंतर व्यक्त केली जात आहे.

गोरेवाडा प्रशासनाकडून वारंवार बाहेरच्या लोकांकडून आगीचे ओंडके फेकण्याचे प्रकार होत असल्याचे कारण दिले जात आहे.

प्रत्यक्षात या परिसरात गस्तच होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. गवत काढण्यासाठी हजारो रुपये खर्चून यंत्र घेण्यात आले, तरीही जाळरेषांची कामे झालेली नाहीत. गोरेवाडा प्रकल्पात अनुभवी अधिकारी असतानाही त्यांना डावलून स्वमर्जीने चालण्याचा प्रशासनाचा अट्टाहास गोरेवाडय़ाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. विशेष म्हणजे, यामुळे कर्मचाऱ्यांमध्येसुद्धा नाराजी आहे. १० डिसेंबर २०१७ ला घटक क्र. दोनमध्ये लागलेल्या आगीत दोन हेक्टर, ९ जानेवारीला वन्यप्राणी बचाव केंद्राजवळ लागलेल्या आगीत चार हेक्टर, ११ जानेवारीला घटक क्र. दोनमध्ये लागलेल्या आगीत १०० हेक्टर जंगल जळाले होते. सोमवार, २२ जानेवारीला लागलेल्या आगीत सुमारे ४० हेक्टर जंगल जळून खाक झाले.

४० हेक्टर जंगल खाक

सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास सेंटर पॉईंट शाळेच्या बाजूने गोरेवाडय़ाच्या संरक्षण भिंतीलगत आगीचे लोळ उठल्याचे नागरिकांना दिसले. गवत आणि वाऱ्याची दिशा जशी बदलत होती, त्याप्रमाणे आग पसरत होती. येथून जवळच उच्चदाब वीज वाहिनी गेली असल्याने आग तिथपर्यंत पोहोचली असती तर आणखी अकल्पित घडू शकले असते. तब्बल दीड ते दोन तासपर्यंत त्याठिकाणी कुणीही कर्मचारी नव्हते. दीड तासानंतर दोन कर्मचारी दुचाकीवर आले. त्यांनी दिलेल्या माहितीनंतर अग्निशमन विभागाचे एक वाहन त्याठिकाणी आले. आग आटोक्यात येत नसल्याचे दिसून येताच पुन्हा वाहन मागवण्यात आले. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवेपर्यंत ३५ ते ४० हेक्टर जंगल जळून खाक झाले होते.

गोरेवाडा क्षेत्र चराईमुक्त केल्यानंतर याठिकाणी काहीजण अवैधरित्या जनावरांना घेऊन जात होते. त्यांना प्रतिबंध घातल्यावर त्यांचा रोष उफाळून आला. याठिकाणी सहा फूट उंच सुरक्षा भिंत असूनही लोक ती ओलांडून गोरेवाडय़ात दारू पिण्यासाठी येतात. यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. आग लागू नये म्हणून पूर्ण प्रयत्न केले जात आहेत. मात्र, एवढय़ा लांब संरक्षण भिंतीजवळ गस्त घालणे थोडे कठीण आहे. सफारी सुरू झाल्यानंतर ही समस्या राहणार नाही.’

 – यू.के. अग्रवाल, व्यवस्थापकीय संचालक, वनविकास महामंडळ