आयआयटी, एनआयटी व तत्सम राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी संस्थांसाठी तसेच इतर सर्व अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रथम वर्षांस प्रवेशासाठी घेण्यात येणारी जेईई मुख्य परीक्षा २३ आणि २६ फेब्रुवारी दरम्यान घेतली जाणार आहे. परीक्षेच्या या पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांना नियमांचे  पालन करावे लागणार आहे.

राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) २३ ते २६ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या जेईई मुख्य परीक्षेसाठी वाढत्या करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांवर अंतर नियम पाळावे लागतील.  यानुसार विद्यार्थ्यांना पाण्याची पारदर्शक बाटली, बॉल पेन आणि सॅनिटायझर यासारख्या वस्तू घेऊन परीक्षा केंद्र गाठावे लागणार आहे. याशिवाय विद्यार्थ्यांकडून परीक्षा केंद्रांवर ‘कोविड सेल्फ डिक्लरेशन’ अर्ज भरून घेतला जाणार आहे. परीक्षा केंद्रावर गर्दी होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना केंद्रावर पोहोचण्याच्या वेगवेगळ्या वेळा देण्यात आल्या आहेत.

परीक्षा केंद्रांवरही थर्मल स्कॅनिंगनंतर विद्यार्थ्यांना तीन थर असणारी मुखपट्टी दिली जाणार आहे.

जेईई मुख्य परीक्षेचा पहिला टप्पा २३ ते २६ फेब्रुवारी, दुसरा १५ ते १८ मार्च, तिसरा २७ ते ३० एप्रिल तर चौथा टप्पा २४ ते २८ मे मध्ये दरम्यान असेल. ‘एनटीए’नुसार, परीक्षेच्या या टप्प्यांमुळे विद्यार्थ्यांना पुन:पुन्हा गुण मिळवण्याची संधी मिळेल. पहिल्या सत्रात विद्यार्थ्यांना परीक्षा कशी दिली जाते, प्रश्न कसे असतात, गुण कसे मिळतात, कट ऑफ कसा असतो हे समजेल.

सर्व सत्रांची परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना एकाच वेळी भरता येईल. शिवाय पहिल्या टप्प्याच्या परीक्षेनंतर उर्वरित सत्रांच्या परीक्षा रद्द करण्याची मुभाही विद्यार्थ्यांना दिली आहे. विद्यार्थ्यांना ज्या सत्रातील गुण योग्य वाटेल त्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. विद्यार्थ्यांचे वर्ष वाचवणे आणि त्यांची गुणवत्ता वाढवण्याच्या उद्देशाने हा बदल केल्याचे एनटीएने सांगितले.