सुविधांचा अभाव आणि ग्राहक येत नसल्याची तक्रार

रस्त्यांवर विक्री करणाऱ्या मासोळी विक्रेत्यांना हक्काची जागा देण्यासाठी महापालिकेने लाखो रुपये खर्च करून मंगळवारी बाजारा शेजारी बांधलेले पहिले  हायजेनिक मासोळी संकुल तेथे सुविधांचा अभाव असल्याने ओस पडले आहे. विक्रेते संकुलाच्या बाहेर  मासोळींची विक्री करीत आहेत. त्यामुळे संकुलावरील लाखो रुपयांचा खर्च व्यर्थ गेला असून ही इमारत शोभेची वस्तू ठरली आहे.

सदर भागातील अंजुमन कॉम्प्लेक्स शेजारी महापालिकेने २.७३ कोटी रुपये खर्च करून मासोळी बाजार संकुल बांधले. यामध्ये एकूण ४ दुकाने आणि १०८ छोटय़ा-मोठय़ा आकाराचे ओटे तयार करण्यात आले. अंतर्गत परिसर स्वच्छ राहावा यासाठी सर्वत्र महागडय़ा टाईल्स लावण्यात आल्या. घाण पाण्यावर प्रक्रिया करून पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी  एफीलीएंट ट्रिटमेंन्ट प्लान्ट (इ.टी.पी.) ची व्यवस्था करण्यात आली. ठोक व्यापाऱ्यांसाठी १८०.२५चौ.मी.जागेचे लिलाव कक्ष तयार करण्यात आले. तसेच एक टन क्षमतेचे आईस युनिट व ४ टन क्षमतेच्या शीतगृहाची व्यवस्थाही करण्यात आली. त्यामुळे नागपुरातील पहिले हायजनिक मासोळी बाजार म्हणून त्याची चर्चा  झाली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संकुलाचे उद्घाटन झाले. ७२ विक्रेत्यांनी संकुलात व्यवसाय करण्याची इच्छा दर्शवली. मात्र कमी पडणारी जागा, स्वच्छतेचा अभाव, ग्राहकांची कमतरता आणि अंतर्गत वादामुळे विक्रेत्यांनी संकुल सोडून आपली दुकाने थेट संकुलाच्या बाहेरील परिसरात थाटण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही ध्येय साध्य झालेले नाही.

शहरात मेयो रुग्णालयाजवळील भोईपुरा येथे मासोळी बाजार आहे. यासोबतच शहरातील अनेक भागांत छोटी-मोठी दुकाने थाटली जातात. विखुरलेला हा व्यवसाय एकत्रित करण्यासाठीच संकुल उभारण्यात आले होते. हे येथे उल्लेखनीय.