संस्काराचे बाळकडू देणाऱ्या संघाकडून वाजपेयींवर टीकेचेही प्रहार

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना ज्या संघभूमीने संस्कार आणि देशभक्तीचे बाळकडू दिले, त्याच नागपूरच्या भूमीत तत्कालीन सरसंघचालक के.सुदर्शन यांनी वाजपेयी यांच्यावर नाराजी व्यक्त करत तोफ डागली होती. त्यामुळे नाराज झालेले अटलजी कधीही संघ मुख्यालय आणि स्मृती मंदिर परिसराकडे फिरकले नाहीत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही मातृसंस्था असल्यामुळे संघातील पदाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार भारतीय जनता पक्ष काम करीत असल्याचा इतिहास आहे. संघाचे अनेक विचार भाजपला पटत नाहीत  मात्र, उघडपणे कधीही संघाच्या विरोधात भूमिका घेतली नाही. संघाच्या आदेशानंतरच भाजप आणि सरकारमध्ये निर्णय घेतले जात असल्याचे अनेकदा समोर आले आहे.

१९९८ ते २००० या काळात तत्कालीन सरसंघचालक रज्जूभैय्या आजारी असताना सुदर्शन यांच्याकडे सरसंघचालक पदाची सूत्रे  दिली जाणार होती. मात्र, त्यावेळी अटलजींनी संघाच्या कोअर कमिटीकडे नापसंती व्यक्त केली होती. सरसंघचालक कोण होईल हे भाजप ठरवणार का, असा सवाल करून सुदर्शन यानी संताप व्यक्त केला होता.  दरम्यान, रज्जूभय्यांची प्रकृती ढासळल्यानंतर सुदर्शन यांच्याकडे सरसंघचालक म्हणून सूत्रे देण्यात आली. त्यानंतर २००४ मध्ये  एका राष्ट्रीय वृत्त वाहिनीला मुलाखत देताना सुदर्शन यांनी त्यांच्या मनातील राग व्यक्त करताना तेव्हा केंद्रात सत्तेत असलेल्या वाजपेयी सरकारवर  टीका केली होती. दरम्यान, त्याच काळात भारतीय मजदूर संघ, स्वदेशी जागरण मंच यांनीही वाजपेयी सरकार विरोधात संघावर दबाव वाढविला होता. याच काळात सुदर्शन यांनी  पंतप्रधान कार्यालयात अमेरिकन धार्जिणी मंडळी आहेत. ते या देशाचे भले करणार नाहीत आणि देशहिताच्या दृष्टीने ते योग्य नाही, असे सनसनाटी विधान केले होते.  त्यामुळे वाजपेयी नाराज झाले होते.

२००० मध्ये अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना नागपुरात पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची सभा होती. त्यावेळी त्यांनी रेशीमबागला स्मृती मंदिर परिसर आणि संघ मुख्यालयाला भेट दिली होती. त्यानंतर २००४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी  प्रचाराच्यानिमित्ताने अटलजी नागपुरात आले होते. तेव्हा संघ आणि सरकार यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले होते. त्यामुळे  स्मृती मंदिर आणि संघ मुख्यालयाकडे ते फिरकले नाहीत. त्यानंतर अटलजी प्रकृती अस्वास्थ्यामुळे नागपुरात कधी आलेच नाहीत.

तत्कालीन सरसंघचालक सुदर्शन यांचा अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर राग होता. त्यामुळे त्यांनी प्रसार माध्यमातून वाजपेयी सरकारवर टीका केली होती. त्यामुळे अटलजी त्यानंतर संघ मुख्यालयात कधीच आले नाहीत.      – दिलीप देवधर, संघ विचारक

संघाने वाजपेयींवर टीका केली किंवा त्यांनी पायउतार व्हावे अशी कुठलीही भूमिका घेतल्याचे ऐकिवात नाही.         – मा.गो. वैद्य, संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि विचारवंत