पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात स्वच्छ भारत अभियान सुरू केले व त्याला चांगला प्रतिसादही मिळाला; पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी लावून धरताना घोषणाबाजीबरोबरच विधानसभेत कागदपत्रे फाडून भिरकावण्यात आली आणि सत्ताधारी व विरोधकांमध्ये संघर्षांचे वातावरण निर्माण झाले. त्याची परिणती सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आणि नंतर विरोधकांच्या सभात्यागात झाली.

अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधकांनी आणि विशेषत: काँग्रेसने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. दररोज सभागृहाबाहेर व कामकाज सुरू असतानाही सरकारविरोधात घोषणाबाजी, फलक फडकावणे आणि कागदपत्रे फाडून सभागृहात भिरकावणे, हे प्रकार सुरू आहेत. भाजप विरोधी पक्षात असताना संसद असो की विधिमंडळ, हे प्रकार कधी घडलेच नाहीत, असे नाही; पण विधानसभेत योगेश सागर हे तालिका सदस्य अध्यक्ष म्हणून काम पाहात होते. अस्लम शेख व अन्य काही सदस्यांनी कागदपत्रे फाडून सभागृहात भिरकावण्यास सुरुवात केल्यावर योगेश सागर संतापले. सभागृह हे पवित्र असून तेथे कचरा करू नका. विरोधकांना आपला निषेध व्यक्त करण्याचा अधिकार आहे; पण आपण स्वच्छता मोहीम राबवीत असताना हे करणे योग्य नाही. पुन्हा कागदाचे तुकडे फेकल्यास सदस्यांना सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश देईन, अशी तंबी त्यांनी दिली. त्यामुळे विरोधक संतप्त झाले व सत्ताधारी सदस्यही आपल्या जागा सोडून आरडाओरड करू लागले. त्यामुळे कामकाज तहकूब करण्यात आले. सभागृहाबाहेर काढण्याची धमकी विरोधकांना दिल्याने ही गळचेपी असून तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी माफी मागण्याचा आग्रह विरोधी पक्षांनी धरला; पण तो अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मान्य न केल्याने अखेर सभात्याग झाला.पंतप्रधान मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छता मोहिमेबाबत भाजपचे आमदार योगेश सागर हे आग्रही आहेत. दर शनिवारी सकाळी ते स्वत: हाती झाडू घेऊन आपल्या विभागात स्वच्छता मोहीम राबवीत असतात. त्यामुळे किमान ते अध्यक्ष म्हणून काम पाहात असताना विरोधकांना जपूनच निषेध नोंदवावा लागणार आहे, नाही तर पुन्हा खणाखणी होण्याची शक्यता आहे.