सहकाऱ्यावरही चाकूने वार

नागपूर : जुगारात हरलेल्या पैशांची मागणी करणाऱ्या मटका अड्डा चालवणाऱ्याचा कुख्यात गुंडांनी मिळून तलवारीने खून केला. ही घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुजरनगर परिसरात घडली. आनंद प्रभाकर सिरपूरकर (२४) रा. गुजरनगर असे मृताचे नाव आहे. प्रवीण चंद्रदर्शन रंगारी (२२) रा. गुजरनगर हा जखमी आहे.

रितेश शिवरेकर (२२), प्रफुल्ल शिवरेकर, समीर शेंडे, प्रदीप काळे सर्व रा. गुजरनगर आणि यश गोस्वामी रा. पारडी अशी आरोपींची नावे असून ते फरार आहेत. आनंद हा परिसरात मटका अड्डा चालवायचा. आरोपी रितेश व इतरांविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. ते गुंड प्रवृत्तीचे असून ते आनंदकडे जुगार खेळायचे. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून ते जवळपास १५ ते २० हजार रुपये हरले होते. जुगारातील पैसे वसूल करण्यासाठी आनंद त्यांना नेहमी विचारत होता.

काही दिवसांपूर्वी त्यांच्यात पैशावरून वाद झाला. लोकांसमोर झालेल्या अपमानाचा वचपा काढण्यासाठी रितेशने त्याच्या खुनाची योजना आखली. सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास आनंदला जुगारात हरलेले पैसे देण्याच्या बहाण्याने स्वत:च्या घरासमोर बोलावून घेतले. आनंद हा आपला मित्र प्रवीण याला घेऊन आरोपींच्या घरासमोर गेला असता त्यांनी तलवार व चाकू घेऊन त्यांच्यावर हल्ला केला. आनंदवर अनेक वार करण्यात आले. मदतीसाठी धावलेल्या प्रवीणवरही चाकूने वार करण्यात आले. त्यानंतर आरोपी पळून गेले. प्रवीणने आरडाओरड केली असता नागरिक मदतीसाठी धावले. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी खून व खुनाचा प्रयत्न असा गुन्हा दाखल केला. यश गोस्वामी या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले असून इतर आरोपी अद्याप फरार आहेत.

शहरात आतापर्यंत ५५ खून

गेल्या काही दिवसांपासून शहरातील गुन्हेगारासंदर्भात सर्वच स्तरातून चर्चा होत आहे. गणेशपेठमध्ये गुंड रस्त्यावर शस्त्र घेऊन निघतात व दुकान व दुचाकींची तोडफोड करीत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्र निर्माण झाला आहे. आतापर्यंत शहरात एकूण ५५ खुनाच्या घटना समोर आल्या आहेत. २०१८ च्या तुलनेत खुनाच्या घटनांमध्ये १५ ने वाढ आहे. खुनाच्या प्रयत्नाच्या घटना ४२ घडल्या असून १८ ने वाढ आहे. त्यानंतर दरोडय़ाच्या घटन ७, जबरी चोरी २, घरफोडी ३१, फसवणूक ५४ आणि खंडणीच्या गुन्ह्य़ात १ ने घट नोंदवण्यात आली. खुनाच्या एकूण घटनांपैकी २९ खून कौटुंबिक कलहातून घडले आहेत. तीन खुनाच्या घटना गुन्हेगारांच्या असून कोतवालीतील घटना चौथी आहे.

सिनेस्टाईल हल्ला

रितेश हा कुख्यात गुंड असून त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. आनंदला भेटायला बोलावत असताना त्याने आपल्या साथीदारांसह मिळून खुनाची योजना आखली. मित्रांना आपल्या घराच्या परिसरात शस्त्रांसह लपवून ठेवले. आनंद हा आपल्या मित्रांसह पोहोचला असता त्याच्याशी पैशावरून वाद घातला. त्यानंतर ठरल्याप्रमाणे आरोपी आपापल्या ठिकाणाहून बाहेर निघाले व अचानकपणे हल्ला करून खून केला.