• आज जागतिक दमा दिन
  • नागपुरात सुमारे साडेतीन लाख रुग्ण

उन्हाळा आला की शीतपेय, आईसक्रीमची विक्री वाढते. दिवसभऱ्याच्या उकाडय़ातून सुटका करण्यासाठी अनेक जण रात्री आईसक्रीम आणि दहीमिश्रित लस्सीचा स्वाद आवर्जून घेतात. मात्र, ही सवय धोक्याची ठरू शकते. वैद्यकीय क्षेत्रातील एका अभ्यासातून रात्रीला थंड पदार्थाचे सेवन केल्यास दमा होण्याची शक्यता बळावते, असे दिसून आले आहे. नागपूरमध्ये साडेतीन लाखाहून अधिक नागरिकांना दमा असण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

मानवी शरीरातील नाक, घसा यासह इतरही अवयव अधिक संवेदनशील मानले जातात. जास्तच थंड, गरम, आंबट वा तिखट पदार्थाचे सेवन केल्यास घशात खवखव, नाकातून पाणी येणे यासारखे प्रकार घडतात. काहींना एखाद्या पदार्थाची ‘अ‍ॅलर्जी’ही होऊ शकते. खोकला असणाऱ्यांना दम्याचा त्रास वाढतो. रात्री आईसक्रीम, दह्य़ाचे सेवन केल्यावरही दमा होण्याची शक्यता असते, असे या क्षेत्रातील अभ्यासातून पुढे आले आहे. तेव्हा आईसक्रीम वा दही खाण्याची इच्छा असेल तर ते दिवसा खा! आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार शहरातील एकूण लोकसंख्येच्या १२ ते १५ टक्के नागरिकांना दम्याचा आजार आहे. नागपुरात सुमारे साडेतीन लाखावर ही संख्या आहे. दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळुरू, कोलकाताच्या तुलनेत ही संख्या कमी आहे. नागपुरात वृद्धांच्या तुलनेत मुलांमध्ये दम्याचे प्रमाण जास्त आहे. योग्य काळजी घेतल्यास रुग्ण सामान्य जीवन जगू शकतो. दम्याचा आजार वाढण्याला शहरातील वाढते प्रदूषण, खानपानाच्या वाईट सवई सुद्धा जबाबदार आहेत.

लक्षणे

  • श्वास घेताना त्रास होणे
  • खोकला
  • छातीत जळजळ
  • चालताना दम येणे

उपचार

  • ‘पीएफटी’च्या माध्यमातून निदान व डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार
  • धूळ, धूर, थंडपेय, वायू प्रदूषणापासून दूर राहणे
  • संतापावर नियंत्रण ठेवणे

हल्ली शहरात रात्रीला आईसक्रीम व दही खाणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. या थंड पदार्थामुळे दम्याची शक्यता वाढते. याशिवाय धुळीचे कण शरीरात गेल्यानेही हा आजार  होतो, असे विविध अभ्यासातून निदर्शनास आले आहे.

डॉ. अशोक अरबट, वरिष्ठ पाल्मोनोलॉजिस्ट, नागपूर