News Flash

उपराजधानीत पुन्हा शिवसंस्कृतीचे दर्शन

डीजेच्या झगमगाटात ढोलताशा संस्कृती संपली आहे आणि ती केवळ पुण्यासारख्या शहरातच जिवंत आहे,

ढोलताशा निनादला, तलवारबाजी व दांडपट्टय़ाची मनोवेधक प्रात्यक्षिके
डीजेच्या झगमगाटात ढोलताशा संस्कृती संपली आहे आणि ती केवळ पुण्यासारख्या शहरातच जिवंत आहे, अशी धारणा सगळीकडे होत चालली होती. या धारणेला छेद देण्याचे काम गेल्या तीन-चार वर्षांपासून नागपूर शहराने गणेशोत्सवातून शिवसंस्कृतीचे दर्शन घडवणारा ढोलताशा वाजवून सुरूकेली. गुढीपाडव्याच्या निमित्ताने शहरात आज या पथकाने भगवा फेटा आणि पांढऱ्या सदरात तलवारबाजी आणि दांडपट्टय़ाच्या करामती दाखवल्या. तब्बल तासाभराच्या या करामतीनंतर ढोलताशा निनादला. यावर्षी संपूर्ण शहरातच ठिकठिकाणी शिवसंस्कृतीची पहाट गुढीपाडव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा नागपूरकरांना अनुभवता आली.
खामला आणि सहकारनगरदरम्यानच्या परिसरात सकाळपासून भाज्यांची रेलचेल असते, त्या परिसरातली सुरुवात आज ढोलताशाच्या निनादाने झाली. शिवाजी महाराजांचे मोठे छायाचित्र आणि आजूबाजूचे वातावरणसुद्धा भगव्या पताकांनी शिवमय झाले होते. सहकारनगर, खामला नववर्ष स्वागत समितीच्यावतीने गुढीपाडव्यानिमित्त तब्बल दोन तास हिंदू संस्कृतीचे दर्शन घडले. सकाळी ७ वाजता भोसला आखाडय़ातील शागीर्द पुरुष आणि महिलांनी लाठी, दांडपट्टा, तलवारबाजीची मनोवेधक प्रात्यक्षिके करून नागरिकांना खिळवून ठेवले. पांढरा ड्रेस आणि भगवा फेटा अशा वेशात त्या रणरागिणी दिसत होत्या. याचवेशातील पुरुषांनीही शिवसैनिकांची अनुभूती त्यांच्या प्रात्यक्षिकातून दिली. त्यानंतर ८ वाजता शिवमुद्रा या ढोलताशा पथकाच्या प्रदर्शनाने संपूर्ण परिसर निनादला. गेल्या काही वर्षांपासून नागपुरातील या पथकाची कौशल्ये नागपूरकरांच्या पसंतीस उतरत आहेत. अवघ्या काही लोकांपासून सुरू झालेल्या या समुहात लहानांपासून तर मोठय़ांची भरती आहे. या पथकातील महिलासुद्धा तेवढय़ाच ताकदीने ढोलताशावर थाप मारतात आणि शिवाजी महाराजांचा तो काळ डोळयासमोर उभा राहतो. तब्बल दीड ते दोन तासाच्या या कार्यक्रमाने नागरिकांनी पुन्हा एकदा पारंपरिक रूपातला गुढीपाडवा अनुभवला. या परिसरासह सक्करदरा आणि बडकस चौकातही पारंपरिक रूपात गुढीपाडव्याची सुरुवात केली. या ठिकाणीसुद्धा या पथकाने त्यांचे कौशल्य दाखवत विसरत चाललेल्या पारंपरिक संस्कृतीला उजाळा दिला. नागरिकांनीही त्यांना तेवढाच प्रतिसाद दिला.

गेल्या काही वर्षांत डीजे आणि संदलचा कानठाळ्या बसवणारा ध्वनीचा आलेख प्रचंड वाढत होता. आडवीतिडवी गाणी आणि त्यावर तसेच हातवारे करत नाचणारी तरुणाईच नव्हे तर मोठी मंडळीसुद्धा या डीजे आणि संदलच्या पूर्णपणे आहारी गेली. पुण्याने त्यांची संस्कृती जपली असताना नागपूर ती विसरत चालले होते. या संस्कृतीला पुनरुज्जिवीत करण्याचे काम शिवमुद्रा ढोलताशा पथकाने केले. तीन-चार वर्षांपूर्वी नागपूरात प्रवेशकर्त्यां झालेल्या या पथकाने इतरांनाही त्या दिशेने वळवले आणि शिवमुद्राशी साधम्र्य साधणारे ढोलताशा पथक आता नागपुरात उदयास आले. याच संस्कृतीचा मिलाफ आज नागपुरात गुढीपाडव्याच्या निमित्ताने पाहायला मिळाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2016 2:13 am

Web Title: gudi padwa 2016 celebration with traditional way at nagpur
Next Stories
1 आयोजकांकडून न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन
2 अतिक्रमणाला संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध फौजदारी गुन्हा
3 सोनिया व राहुल गांधी एका व्यासपीठावर
Just Now!
X