डॉक्टरसह एकूण १८ नवीन संशयित दाखल

नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे मंगळवारी दिवसभऱ्यात एका निवासी डॉक्टरसह एकूण १८ करोना संशयित  रुग्णांना दाखल करण्यात आले. त्यांचे नमुने तपासणीसाठी मेयोच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत तर दुसरीकडे प्रशासनाकडून आता आरोग्य कर्मचाऱ्यांत एकही लक्षण आढळताच त्यांची करोना तपासणीचे आदेश दोन्ही रुग्णालयांना देण्यात आले आहेत.

नागपूरसह देशभऱ्यात करोनाशी संबंधित नमुने तपासणाऱ्या प्रयोगशाळा व तेथे तपासण्याची क्षमता कमी आहे. त्यामुळे पूर्वी सरकारने विदेशात प्रवासाचा इतिहास असलेल्या व्यक्तींसह त्यातील सकारात्मक अहवाल असेल्या रुग्णाच्या संपर्कातील प्रत्येक व्यक्तीचीच करोना तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या संशयितांच्या घशातील द्रव्याचे नमुने तपासले जात आहेत.

दरम्यान, शासनाने हा आजार समाजात पसरण्याचा धोका बघत आता प्रत्येक शासकीय व खासगी रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या निमोनियाच्या रुग्णांचेही करोना तपासणी करण्याचे निश्चित केले आहे. त्यातच आता या रुग्णांना उपचार देणाऱ्यांसह इतर आरोग्य कर्मचाऱ्यांत एकही करोनाचे लक्षण आढळताच त्यांचेही करोना तपासणी केली जाणार आहे.

मंगळवारी सुपरस्पेशालिटी रुग्णालयात बधिरीकरणशास्त्रच्या एका निवासी डॉक्टरला दाखल करून त्यचे नमुने तपासणीसाठी पाठवले गेले.

हा रुग्ण यापूर्वी मेडिकलच्या काही वार्डात उपचार देत होता. या रुग्णासह मंगळवारी मेयोत तब्बल ११ तर मेडिकलला ७ संशयित रुग्ण दाखल केले गेले. या पैकी निम्याहून अधिक रुग्ण हे विदेशात प्रवासाचा इतिहास असलेले व त्यांच्यात सर्दी, खोकला, तापाची लक्षणे असलेली आहेत.

परिचारिकांमध्ये रोष

करोनाशी संबंधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या मेडिकलच्या १५ तर मेयोतील १५ अशा एकूण ३० परिचारिकांना अद्यापही प्रशासनाने वैयक्तिक सुरक्षा संचासह इतर आवश्यक सुरक्षेशी संबंधित साधने आवश्यक संख्येत दिले नाहीत. त्यामुळे परिचारिका संतापल्या असून तातडीने प्रशासनाने ही साधने उपलब्ध करून देण्याची मागणी संघटनेची अध्यक्ष कल्पना विंचूरकर यांनी दिली.