News Flash

उष्माघाताच्या रुग्णांची लपवा-छपवी?

नागपूर जिल्ह्य़ातील तापमान गेल्या काही दिवसांपासून ४५ ते ४६ अंश सेल्सियसच्या दरम्यान आहे.

नागपुरात केवळ १९६ रुग्णांची नोंद

नागपुरात उष्णतेची लाट सुरू असताना केवळ १९६ उष्माघाताच्या रुग्णांची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे आहे. तेव्हा शासकीय व खासगी रुग्णालयांकडून या रुग्णांच्या कागदी प्रक्रिया टाळण्याकरिता लपवा-छपवी होत असल्याचा आरोप होऊ लागला आहे. त्यातच हा रुग्ण उन्हासह इतरही आजाराचा इतिहास घेऊन आल्यास त्याची नोंद दुसऱ्या आजारात होत असल्याने हा रुग्ण दगावल्यास त्याच्या मृत्यूची नोंदही उष्माघातात होत नसल्याने शहरात एकही मृत्यू नसल्याची चर्चा वैद्यकीय क्षेत्रात आहे.

नागपूर जिल्ह्य़ातील तापमान गेल्या काही दिवसांपासून ४५ ते ४६ अंश सेल्सियसच्या दरम्यान आहे. त्यामुळे सर्वत्र उष्णतेची लाट पसरली असून कडक उन्हामुळे रस्त्यांवरील वर्दळ कमी झाली आहे. केवळ महत्त्वाच्या कामाकरिता काहींना बाहेर निघावे लागत असून त्यांना उकाडय़ाचा प्रचंड मन:स्ताप होत आहे. हल्ली पारा ४६ अंशावर असल्याने नागरिकांना उन्हाचे जास्तच चटके बसत असून उष्माघातासह विविध प्रकारचे रुग्ण जिल्ह्य़ातील सगळ्याच शासकीय व खासगी रुग्णालयांत वाढले आहेत. सगळ्या रुग्णालयांत बाह्य़रुग्ण विभागात उन्हाचा इतिहास घेऊन आलेल्या रुग्णाला दाखल न करता औषधोपचार केल्या जातो. हा उष्माघाताचा रुग्ण असला तरी त्याच्या नोंदीची प्रक्रिया क्लिष्ट असल्यामुळे अनेकजण कागदी प्रक्रियाच करत नाहीत. शहरात मेडिकल, मेयोसह सगळ्या खासगी रुग्णालयांत केवळ १९६ उष्माघाताचे रुग्ण नोंदवल्या गेले आहेत. येथे गंभीर अवस्थेत दाखल रुग्णाचा इतिहास उन्हासह वारंवार शौच होणे, छातीत दुखणे यासह इतर काही आजाराचा असल्यास त्याला इतर आजारात दाखवत शीत वार्डाऐवजी इतर वार्डात उपचार केला जातो. हा रुग्ण दगावल्यास त्याची नोंद इतर आजारात होत असून हा मृत्यू उष्माघाताचा दाखवला जात नाही. तेव्हा शहरात एवढय़ा उन्हात एकही उष्माघाताचा मृत्यू नसल्याच्या आरोग्य विभागातील नोंदीवर प्रश्न उपस्थित झाला आहे. स्वाईन फ्लूच्या रुग्णाला इतर आजार असल्यास मृत्यूनंतर या रुग्णाची नोंद स्वाईन फ्लूमध्येच होते. तेव्हा उष्माघाताची लपवा-छपवी टाळण्यासाठी आरोग्य विभाग काय करणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

मृत्यू निश्चितीसाठी शवविच्छेदन अहवालाकडे बोट

नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून रुग्णाच्या शवविच्छेदन अहवालावरून संबंधित व्यक्तीचा मृत्यू हा उष्माघात वा इतर हे निश्चित होत असल्याचे सांगण्यात येते, परंतु न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे तज्ज्ञ केवळ शवविच्छेदनाने मृत्यूचे कारण उष्माघात शोधणे शक्य नसल्याचे सांगतात. या अहवालावरून महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या एका समितीकडून संबंधिताच्या शरीराच्या अंशाच्या तपासणीचे अहवाल व इतर अभ्यासातून हा मृत्यू निश्चित केला जातो, परंतु खासगी व शासकीय रुग्णालयांत या रुग्णांच्या इतिहासात उन्हात गेल्याची नोंद नसल्यास मृत्यू उष्माघातात झाल्याचे निश्चित करणे कठीण आहे.

प्रक्रिया सुलभ करा

शासकीय व खासगी रुग्णालयात उपचाराला येणाऱ्या उष्माघाताच्या नोंदीबाबतच्या प्रक्रियेला सोपे करण्याची गरज आहे. त्यामुळे दोन्ही संस्थांमध्ये रुग्णांच्या नोंदी टाळल्या जातात. त्यामुळे मृत्यूही निदर्शनात येत नाही.

त्रिशरण सहारे, अध्यक्ष, विदर्भ वैद्यकीय कर्मचारी संघटना, नागपूर

चौकशी करणार

नागरिकांमध्ये उष्माघाताबद्दल योग्य जनजागृती झाल्यामुळे रुग्ण कमी झाले आहेत. या रुग्णांच्या मेडिकलमध्ये अचूक नोंदी केल्या जातात, परंतु त्या कमी असल्यास चौकशी केली जाईल.

डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता, मेडिकल, नागपूर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2017 3:03 am

Web Title: heat stroke patients issue in nagpur
Next Stories
1 प्रियकरासाठी पतीचा खून
2 पारदर्शक कारभारासाठी स्थायी समितीच्या बैठकीचे चित्रीकरण करा
3 ‘चाय पे चर्चा’च्या आठवणीसाठी काँग्रेसचे एक दिवसाचे दिल्लीत उपोषण