27 September 2020

News Flash

शाळेचा पहिला दिवस पावसात

दोन महिन्यांच्या सुट्टय़ा संपल्यानंतर मंगळवारपासून राज्य शासनाशी संलग्नित शाळा सुरू झाल्या.

शाळेत जाताना पावसाचा आनंद घेताना मुले (लोकसत्ता छायाचित्र)

दोन महिन्यांच्या सुट्टय़ा संपल्यानंतर मंगळवारपासून राज्य शासनाशी संलग्नित शाळा सुरू झाल्या. मात्र, विद्यार्थ्यांचा पहिलाच दिवस पावसाने गाजवला. सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू झालेला पाऊस दुपापर्यंत चांगलाच बरसत होता. त्यामुळे सकाळी आणि दुपारच्या सत्रातील मुलांनी पावसाचा आनंद घेतला.

विदर्भात दरवर्षी २६ जूनला शाळा उघडतात. यावेळी २६ जूनला रमजान ईद आणि २५ जूनची रविवारची सुट्टी अशी उलटी गिनती करून शाळा सुरू होण्याच्या दिवसाची विद्यार्थी वाट पाहत होते. सकाळीच पालकांनी मुलांची तयारी करून दिली मात्र, पावसामुळे शाळेपर्यंत पोहोचता आले नाही. पाऊस आता थांबेल नंतर थांबेल म्हणेस्तोवर पाऊस पडतच राहिला. ज्या कनिष्ठ महाविद्यालयांच्या शाळा सकाळी ७.३० वाजता होत्या, त्यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत केले. पालक सोडवायला आले आणि त्यांनी शिक्षक व मुख्याध्यापकांची भेट घेऊन संवाद साधला. मात्र, ११.३० वाजता पहिली ते चौथीच्या वर्गातील मुलांसाठी अडचणीचे गेले. स्कूल बस घरापर्यंत जाऊनही पालकांनी धो धो पावसात मुलांना शाळेत पाठवण्यास नकार दिला. त्यामुळे अर्धीअधिक मुले शाळेत येऊच शकली नाहीत. घराजवळ शाळा असलेल्या विद्यार्थ्यांनी मात्र छत्री, रेनकोटचा आधार घेत पावसातच शाळा गाठली. पालक नाही म्हणत असतानाही शाळेच्या ओढीपायी काही मुलांनी भिजत का होईना शाळेत जाण्याचा हट्ट पालकांजवळ धरल्याने त्यांना मुलांना शाळेत पोहोचते करावे लागले. एकंदरीत मुलांचा शाळेचा पहिला दिवस पाण्यात गेला. मात्र, जी मुले शाळेत आली त्यांचे गुलाबाचे फूल, चॉकलेट देऊन शाळांनी स्वागत केले.

अनेक शाळांच्या प्रांगणात पाणी साचले. अनेक ऑटो मध्येच बंद पडल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यास विलंब झाला. अनेक पालक छत्री घेऊन मुलांना सोडायला व घ्यायलाही आले होते. त्यांचीही चांगलीच तारांबळ उडाळी.

शाळेच्या पहिल्या दिवसाची विद्यार्थ्यांच्या स्वागताची पूर्ण तयारी करण्यात आली. शाळेच्या जवळपासची मुले धावपळ करीत आले. पालकांनी वेळेवर त्यांना पोहोचते केले. मात्र, नंतरच्या पाळीतील विद्यार्थ्यांचा पावसामुळे खोळंबा झाला. स्कूल बस मुलांना आणायला गेल्या मात्र, सर्व मुले पावसामुळे येऊ शकली नाहीत. बऱ्याच भागात पावसाचे पाणी साचले होते. त्याचाही फटका विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर झाला. डॉ. अशोक गव्हाणकर, मुख्याध्यापक, ठवरे हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2017 12:59 am

Web Title: heavy rain in nagpur part 2
Next Stories
1 बेसा मार्गावरील नवीन पूल वाहून गेला
2 आईवडिलांच्या कुशीत अनघा, जान्हवीचा शेवटचा प्रवास
3 पावसाळी संकटाशी सामना करायचा कसा?
Just Now!
X