करोना रुग्णांकडून अतिरिक्त शुल्क वसूल केल्याप्रकरणी महापालिकेने  सेव्हन स्टार रुग्णालयाला ५ लाखांचा दंड ठोठावला आहे. महापालिकेच्या या निर्णयाला रुग्णालय प्रशासनाने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले असून याचिकाकर्त्यांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत रुग्णालयाकडून दंड वसूल न करण्याचे आदेश दिले. यामुळे रुग्णालयाला मोठा दिलासा मिळाला आहे.

४ जूनला रुग्णालयाला पूर्णपणे कोविड रुग्णालय जाहीर करून दरपत्रक ठरवून दिले. पण, महापालिकेने एक पथक पाठवले व पाहणी केली. त्या पथकाच्या अहवालानुसार रुग्णालयाने करोना रुग्णांकडून ठरवून दिलेल्या दरांपेक्षा अतिरिक्त शुल्क वसूल केले. त्या आधारावर महापालिकेने १४ ऑगस्टला रुग्णालयाला ५ लाखांचा दंड ठोठावला. या आदेशाला रुग्णालयाचे संचालक डॉ. मनीष प्रभाकर दशपुत्र यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आव्हान दिले. रुग्णालयाने अतिरिक्त शुल्क वसूल केल्याची तक्रार एकाही रुग्णाने केलेली नाही. पाहणी पथकाने अहवाल सादर केल्यानंतर रुग्णालय प्रशासनाला बाजू मांडण्याची संधी देण्यात आली नाही. महापालिकेचा निर्णय अवैध असून तो रद्द करण्यात यावा. तसेच रुग्णालयाला कोविड रुग्णालयाच्या यादीतून वगळण्यात यावे, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली. याचिकाकर्त्यांची बाजू ऐकल्यानंतर न्या. सुनील शुक्रे आणि न्या. अनिल किलोर यांनी राज्याच्या आरोग्य विभागाचे सचिव आणि महापालिका आयुक्तांना नोटीस बजावून उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. शिवाय पुढील आदेशापर्यंत रुग्णालयाकडून दंडाची रक्कम वसूल करण्यात येऊ नये, असा तात्पुरता दिलासा रुग्णालयाला दिला. रुग्णालयाच्यावतीने अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी बाजू मांडली.