राज्यात १२ फेब्रुवारीपासून ‘आरटीई’चे अर्ज भरण्यास सुरुवात झाली. राज्यातील ९ हजार ३२८ शाळांमधील १ लाख १५ हजार जागांसाठी १ लाख ६८ हजार पाल्यांची नोंदणी करण्यात आली. विशेष म्हणजे, नागपूरमधून ६ हजार ७९७ जागांसाठी २१ हजार २०० असे चारपट अर्ज आले आहेत. हा राज्यातील सर्वाधिक अर्ज नोंदणीचा आकडा आहे.

आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव असतात. या जागांवर ऑनलाइन लॉटरीच्या माध्यमातून प्रवेश दिले जातात. यावर्षी ही प्रवेशप्रक्रिया तांत्रिक अडचणींमुळे काही काळ खोळंबली होती. पालकांना मोबाइलवर अर्ज भरल्याचे संदेश मिळत नसल्याची तक्रार होती. मात्र, ही अडचण दूर झाली असून मोठय़ा संख्येने पालक प्रवेशप्रक्रियेत सहभागी होत आहेत. राज्यात पुणे जिल्ह्य़ात सर्वाधिक १७ हजार ७५ जागा आहेत. ठाणे जिल्ह्यात १२ हजार ९०० रिक्त जागांसाठी केवळ ११ हजार अर्ज आले आहेत.

पालकांसाठी महत्त्वाच्या सूचना : प्रवेशाचा अर्ज आणि पासवर्ड संपूर्ण प्रक्रिया संपेपर्यंत जपून ठेवावा. प्रवेशअर्जातील माहितीच्या आधारे सोडत काढली जाईल आणि प्रवेश निश्चित केले जातील. सोडत काढल्यानंतर प्रवेशअर्जातील मोबाइल क्रमांकावरच संदेश पाठवला जाईल. आरटीईच्या संकेतस्थळावर ‘अ‍ॅप्लिकेशन वाइज डिटेल्स’ या टॅबवर क्लिक करून पाल्याची निवड झाली की नाही, हे पडताळून पाहता येईल. पडताळणी समितीने तपासणी केल्याशिवाय विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित होणार नाहीत.

निवास, उत्पन्नाची चौकशी : शाळांमध्ये आरटीईअंतर्गत प्रवेश मिळवण्यासाठी अर्ज करणाऱ्या आणि लॉटरीत प्रवेश मिळवलेल्या पालकांचे निवास आणि त्यांच्या अर्थार्जनाचे प्रमाणपत्र यांची चौकशी केली जाईल. यामध्ये काही चुकीचे आढळल्यास त्यांची निवड आपोआप रद्द केली जाईल.