करोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने अर्ज मागवले

नागपूर : करोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आरोग्य उपसंचालक, नागपूर मंडळाकडून तातडीने विविध संवर्गातील पदे भरण्याबाबत अर्ज मागवण्यात आले आहेत. परंतु त्यातही होमिओपथी तज्ज्ञांना वगळल्याचा आरोप होमिओपॅथी तज्ज्ञांच्या विविध संघटनांनी केला आहे. हा प्रकार नियमबाह्य़ असून केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या सूचनांना त्यातून हरताळ फासल्याचे होमिओपॅथी तज्ज्ञांचे म्हणने आहे.

नागपूरसह देशात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून आयुषवर भर दिला गेला. परंतु नागपूरच्या आरोग्य उपसंचालक कार्यालयाने कंत्राटी पद्धतीने करायच्या डॉक्टरांच्या पदभरतीच्या जाहिरातीतून होमिओपॅथी डॉक्टरांना वगळले आहे. विशेष असे की, हजारो होमिओपॅथी डॉक्?टरांनी अ‍ॅलोपॅथी संवर्गात प्रॅक्टिस करण्याचा ब्रीज कोर्स केला आहे. त्यानंतरही त्यांना नोकरीसाठी पात्र ठरवले जात नसल्याची खंत होमिओपॅथी डॉक्टर बोलून दाखवत आहेत. हॅनिमन यांनी ही पॅथी शोधून काढली. अतिशय स्वस्त आणि प्रभावी उपचारपद्धती म्हणून आज ही मान्यताही पावली आहे. महाराष्ट्र सोडून इतर राज्यांत नोंदणीसाठी स्वतंत्र संचालनालय आहे.

बिहारसारख्या मागासलेल्या राज्यात स्वतंत्र संचालनालय आहे. नागपूर जिल्ह्यत सुमारे बारा हजार डॉक्टरांना कुठलेही शासकीय संरक्षण नसताना ते  व्यवसाय करीत आहेत. महाराष्ट्रात दरवर्षी दोनशे विद्यार्थी परीक्षा देऊन डॉक्टर होतात. करोनाच्या या काळात बीएएमएस (आयुर्वेद) तसेच बीयूएमएस (युनानी) डॉक्टरांना गावखेडय़ात सेवा देण्यासाठी शासनाकडून नियुक्ती देण्यात येत आहे, परंतु होमिओपॅथी डॉक्टरांवर अन्याय करण्यात आला आहे. राज्यात ७३ हजार होमिओपॅथ आहेत.

पूर्व विदर्भात सुमारे चार हजारापेंक्षा अधीक होमिओपॅथ डॉक्टर आहेत. यांना करोनाशी सुरू झालेल्या या लढाईपासून लांब का ठेवण्यात येत आहे, असा सवाल महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेचे उपाध्यक्ष व ऑरेंज सिटी होमिओपॅथी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मनीष पाटील यांनी केला आहे. मुंबईत होमिओपॅथी डॉक्टर घेतले जात असतानाच नागपुरात अन्याय का, हा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

‘शासनाच्या नियमाप्रमाणे तीन महिन्यांसाठी  कंत्राटी पद्धतीने भरतीची जाहिरात दिली आहे. त्यात काहीही गैर नाही.’’

– डॉ. संजय जयस्वाल,

आरोग्य उपसंचालक, सार्वजनिक आरोग्य विभाग, नागपूर.