समाजाला एकसंघ ठेवण्यासोबत त्याच्या विकासासाठी निष्ठेने काम करणारे अनेक लोक असतात. अशा व्यक्ती समाजासाठी आदर्श असतात. भाजपचे ज्येष्ठ नेते बळवंतराव ढोबळे किंवा विठ्ठलराव जिभकाटे हे समाजाचे आदर्श आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

तेली समाजाचा जवाहर विद्यार्थी गृहात युवक-युवती मेळाव्यासह समाजातील ज्येष्ठांचा सत्कार गडकरी  यांच्या हस्ते करण्यात आला होता, त्यावेळी नितीन गडकरी बोलत होते. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते बळवंतराव ढोबळे, ज्येष्ठ योगतज्ज्ञ विठ्ठलराव जिभकाटे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गडकरी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. आमदार रामदास आंबटकर आणि कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. बळवंतराव ढोबळे प्रकृती अस्वास्थ्यामुळे येऊ न शकल्याने त्यांच्या मुलाने सत्कार स्वीकारला. यावेळी गडकरी म्हणाले, जनार्दन स्वामी यांच्यापासून प्रेरणा घेत विठ्ठलराव जिभकाटे यांनी समाजाचे स्वास्थ्य चांगले राहण्यासोबतच योगकार्याचा वसा घेत आबाल वृद्धांमध्ये योगाचा प्रचार व प्रसार केला. जनसंघाच्या काळापासून बळवंतराव ढोबळे यांनी पक्ष वाढवण्यासाठी काम केले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली आहे. तेली समाजातील शोषित पीडित लोकांसाठी त्यांनी प्रामाणिकपणे काम केले आणि त्यांना न्याय मिळवून दिला. पक्षाच्या कठीण काळात त्यांनी काम संघटन वाढवले आहे, त्यामुळे आम्हाला काम करण्याची संधी मिळाली आहे, अशा शब्दात बळवंतराव यांच्या कार्याचा  गडकरी यांनी  गौरव केला.  रमेश गिरडे यांनी प्रास्ताविक केले. त्यापूर्वी समाजातील युवक-युवतींचा परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शंभरपेक्षा अधिक युवक-युवतींनी या मेळाव्यात परिचय करून दिला. यावेळी सुयोग या पुस्तकाचे प्रकाशन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.