News Flash

तक्रार असेल तोच खड्डा बुजवणार!

शहरात मेट्रो, सिमेंट रस्ते व उड्डाणपुलांची कामे सुरू आहेत. त्याकरिता रस्त्यांच्या मधोमध खड्डे खोदण्यात आले आहेत.

मोक्षधाम चौक रस्त्यावर पडलेले जीवघेणे खड्डे

 

  • महापालिकेचा गजब कारभार
  •  तक्रारही लेखीच असायला हवी

शहरातील सर्वच रस्ते खड्डेमय असताना व रस्त्यांवरील सरसकट सर्वच खड्डे बुजवणे अपेक्षित असताना महापालिकेचा मात्र अजब कारभार सुरू आहे. ज्या खड्डय़ाबाबत लेखी तक्रार असेल तोच खड्डा प्राधान्याने बुजवायचा. त्या खड्डय़ाखेरीज इतर खड्डे कितीही जीवघेणे असले तरी त्याकडे दुर्लक्ष करायचे, असे धोरण सध्या महापालिकेने स्वीकारले आहे. परिणामी, शहरातील खड्डय़ांची संख्या दिवसागणिक वाढत असून नागपूरकरांचे आयुष्यच धोक्यात आले आहे.

शहरात मेट्रो, सिमेंट रस्ते व उड्डाणपुलांची कामे सुरू आहेत. त्याकरिता रस्त्यांच्या मधोमध खड्डे खोदण्यात आले आहेत. त्यात पुन्हा ओसीडब्ल्यू आणि केबल ऑपरेटर्सही खड्डे खोदत आहेत. त्यामुळे शहरातील रस्ते खड्डेमय झाले असून लोकांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत आहे. गेल्या १४ ऑगस्टला अंबाझरी मार्गावर खड्डय़ांमुळे मोपेडचा तोल जाऊन तीन मुली मेट्रोच्या क्रेनखाली येऊन चिरडल्या गेल्या. तेव्हापासून खड्डय़ांच्या विषयावर चर्चा सुरू आहे. यासंदर्भात माहिती घेतली असता रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात खड्डे असताही महापालिकेचे अधिकारी मात्र केवळ लेखी स्वरूपात तक्रार दिल्यानंतरच खड्डय़ांची दखल घेत, असल्याचे समोर आले. त्यानुसार, एप्रिल ते जूनपर्यंत महापालिकेकडे एक हजार ९ खड्डय़ांची तक्रार प्राप्त झाली. मात्र, त्यापैकी  केवळ ७३३ खड्डय़ांवर डागडूजी करण्यात आली. उर्वरित २६६ खड्डे तसेच राहिले. ऑगस्टपर्यंत ही संख्या जवळपास ४ हजार खडडय़ांवर गेली असून महापालिकेने त्यापैकी ३ हजार खड्डे बुजवण्याचा दावा केला आहे. ही सर्व आकडेवारी लेखी स्वरूपात नागरिकांनी व झोन कार्यालयांनी दखल घेतलेल्या खड्डय़ांची आहे. अदखलपात्र खड्डय़ांची संख्या तर यापेक्षा कितीतरी अधिक आहे.

पावसाळ्यात डांबरीकरण कसे करणार?

खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेचा स्वत:चा हॉटमिक्स प्रकल्प आहे. त्या माध्यमातून खड्डे बुजवण्यात येतात. मात्र, खड्डे आणि रस्ता उखडणे हे दोन वेगवेगळे प्रकार असतात. खड्डा बुजवण्यासाठी कमी खर्च येतो, तर रस्ता उखडला असेल तर त्याच्यावर थर चढवण्याचा खर्च अधिक असतो. पावसाळ्यात खड्डे बुजवण्यासाठी हॉटमिक्स प्रकल्प बंद असल्याने चुरी टाकून ते दाबण्यात येतात. ही तात्पुरती उपाययोजना असते. मात्र, जोरदार पाऊस झाल्यानंतर चुरी निघते व खड्डे उघडे पडतात. सप्टेंबर महिन्यापासून हॉटमिक्स प्रकल्प सुरू होतो व त्यानंतर डांबरीकरणाने खड्डे बुजवण्यात येतात. लवकरच हॉटमिक्सद्वारा खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात येईल. मात्र, तोपर्यंत तात्पुरत्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

– विजय बंगिनवार, सेवानिवृत्त मुख्य अभियंता व सल्लागार, महापालिका.

१२ मीटरच्या रस्त्यांनाच प्राधान्य

शहरात महापालिकेच्या अधिकारक्षेत्रात ६ ते १२ मीटपर्यंतचे अनेक रस्ते येतात. मात्र, महापालिका प्रशासन केवळ १२ मीटरच्या रस्त्यांनाच अधिक महत्त्व देत असून वस्त्यांमधील रस्त्यांवर असलेले खड्डे बुजवण्याकडे पार दुर्लक्ष करत आहे. वस्त्यांमध्ये खोदून ठेवलेले रस्ते कोणी बुजवावे, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

मोबाईलवरील तक्रारीला नकार

सध्याचे युग माहिती व तंत्रज्ञानाचे आहे. अशात बँकेपासून ते कर भरण्यापर्यंत सर्व व्यवहार मोबाईलवरून होतात. मात्र, शहरातील रस्त्यांवर असलेल्या खड्डय़ांसंदर्भात केवळ लेखी स्वरूपात तक्रार दिली तरच महापालिकेचे सार्वजनिक बांधकाम विभाग दखल घेते. भ्रमणध्वनी करून किंवा संदेश पाठवून खड्डय़ांची माहिती दिल्यास त्यावर कारवाई होताना दिसत नाही.

चांगले रस्ते हा मूलभूत अधिकार

मुंबई आणि परिसरातील खड्डय़ासंदर्भातील जनहित याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. अभय ओक आणि न्या. आर.आय. चांगला यांनी वाहतूक, चालण्यासाठी चांगले रस्ते व  फूटपाथ मिळणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचे मत व्यक्त करीत राज्य सरकारला रस्त्यांवरील खड्डय़ांच्या दुरुस्तीकडे विशेष लक्ष देण्याचे आदेश दिले. त्यामुळे उपराजधानीत असलेल्या खड्डय़ांकडे या आदेशान्वये बघण्यात येईल का, असा सवाल आता विचारण्यात येत आहे.

जनहित याचिकेचाही पर्याय वापरला

पावसाळ्यात खड्डय़ांमध्ये पाणी भरल्यानंतर काहीच दिसत नाही व त्यातून अपघात होऊन लोकांचा जीव जाण्याची शक्यता असते. शिवाय खड्डय़ांमुळे वाहनचालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणामही होतात. त्यामुळे काही वर्षांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्यां आणि अ‍ॅड. स्मिता सरोदे सिंगलकर यांनी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करून खड्डय़ांचा विषय उचलून धरला होता. मात्र, त्या याचिकेवर न्यायदंडाधिकाऱ्यांनी केवळ महापालिकेचे कार्यालय सिव्हिल लाईन परिसरात आहे म्हणून सरसकट खड्डय़ांवरील याचिका ऐकण्याचे अधिकार आपल्याला नाही. एका विशिष्ट खड्डय़ाविषयी तक्रार असल्यास ऐकण्याची इच्छा दर्शवली होती. त्यानंतर ती याचिका निकाली  काढण्यात आली होती. मात्र, आजही रस्त्यांवरील खड्डे आणि परिस्थिती बदललेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2018 2:28 am

Web Title: if there is a complaint he will dig the pit
Next Stories
1 अंधश्रद्धेमुळे सॅनिटरी नॅपकिन उद्योगांची संख्या कमी
2 सुटीच्या दिवशी रस्तेच होतात वाहनतळ
3 अनधिकृत धार्मिक स्थळांवरील कारवाई पुन्हा सुरू
Just Now!
X