स्थानिक पोलिसांची कृपादृष्टी
शहरातील गुन्हेगारांवर अंकुश लावण्यात पोलिसांना यश आले असले तरी, शहरातील अवैध धंदे नेहमीप्रमाणे सुरू असून अनेक बार मालकांनी सुगम संगीताच्या नावावर परवाने मिळवून ‘डान्सबार’ सुरू केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, हे सर्व स्थानिक पोलिसांच्या कृपादृष्टीने सुरू असल्याचे सांगण्यात येते.
अवैध धंदे आणि त्यातून मिळणाऱ्या पैशातूनच गुन्हेगारीचा जन्म होतो. गुन्हेगारी वाढण्यासही अशा धंद्यांचाच हातभार असतो, हे सर्व पोलिसांनाही माहीत आहे.
त्यानंतरही शहरात मोठय़ा प्रमाणात अवैध धंदे सुरू असल्याची बाब निदर्शनास येत असून यात प्रामुख्याने अवैध दारू विक्री आणि अवैध डान्सबारचा समावेश आहे. धंतोलीतील निडोज बारवर वारंवार कारवाई करून त्याचा सुगम संगीतचा परवाना पोलिसांनी रद्द केला. त्याशिवाय गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका लॉजमध्ये अवैध डान्सबार सुरू आहे. लॉजमध्ये बार किंवा सुगम संगीतचा परवाना नसतानाही केवळ आनंद नावाच्या हवालदाराच्या जोरावर तेथे डान्सबारसह मद्यविक्री केली जात असल्याची चर्चा आहे.
त्याशिवाय हिंगणा पोलीस ठाण्यांतर्गत मोंढा येथे आदित्य बार, एमआयडीसीमध्ये एसीई (एस) पब, कामठीमध्ये वेलकम बार, मोमिनपुरा, मच्छीबाजार परिसरातील मदिरा बार, कळमना परिसरातील सर्जा बार, नंदनवन परिसरातील संग्राम बार यांना सुगम संगीताचे परवाने मिळाले आहेत. त्या ठिकाणी नियमांची पायमल्ली केली जात असल्याची माहिती आहे.
सुगम संगीताच्या नावाखाली गाणे गाण्याकरिता मुलींना ठेवण्यात येते. मात्र, गाणे गाण्याऐवजी त्या मुली नृत्य करून ग्राहकांना रिझवतात. यात बार मालकांच्या व्यवसायात प्रचंड वाढ होते.
निडोजप्रमाणेच वरील बार मालकांवर पोलीस कारवाई करतील का, असा सवाल पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांना करण्यात येत आहे.
अवैध ‘डान्सबार’वर कारवाई होणार
सुगम संगीताचा परवाना घेऊन अवैध डान्सबार चालवण्यात येत असतील, तर ही गंभीर बाब आहे. अशा बारवर कारवाई करून संबंधितांचे परवाने रद्द करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
– डॉ. के. व्यंकटेशम, पोलीस आयुक्त.
‘विल डू’
शहरातील अवैध डान्सबारसंदर्भात एक व्हिडीओ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पाठवण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी ‘विल डू’ अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर तो व्हिडीओ कारवाईकरिता गुन्हे शाखेकडे पाठवण्यात आला. मात्र, अद्याप कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे स्थानिक पोलिसांच्या मदतीने अवैध ‘डान्सबार’चं चांगभलं सुरू आहे, अशी शंका आहे.