‘बिहार से तिहार’चे प्रकाशन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीत आग्रह धरून देशाच्या सामंतवादी, जातीवादी, मनुवादी व्यवस्थेला दूर सारण्यासाठी एक चांगली घटना देशाला दिली. त्यावेळी बाबासाहेबांनी दिलेला स्वातंत्र्याचा संदेश अजूनपर्यंत समाजापर्यंत पोहोचलेला नाही. त्या स्वातंत्र्याची मागणी आम्ही करतो. आम्हाला काहीही वेगळे नको आणि अधिकचेही नको, बाबासाहेबांनी घटनेत जे सांगितले तेवढेच आम्हाला द्या, असे प्रतिपादन कन्हैयाकुमार यांनी केले.

कन्हैयाकुमार यांच्या ‘बिहार से तिहार’ या मूळ आत्मकथनाचे मराठी अनुवादित पुस्तक ‘बिहार ते तिहार’चे प्रकाशन धनवटे राष्ट्रीय महाविद्यालयाच्या पंजाबराव देशमुख सभागृहात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. हरिभाऊ केदार यांच्या हस्ते झाले. अखिल भारतीय प्रगतिशील लेखक संघ आणि लोकवाङ्मय गृह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर होते. व्यासपीठावर अनुवादक डॉ. सुधाकर शेंडगे होते. ‘बिहार से तिहार’ हे पुस्तक म्हणजे माझे आत्मचरित्र नाही तर मी कारागृहात कां गेलो हे सांगण्यासाठी ‘विद्यार्थी ते कारागृह’ असा यात्रा वृत्तांत आहे. या पुस्तकाने समाजात क्रांती होणार नाही. पण लोकांना बाबासाहेबांना अपेक्षित स्वातंत्र्याची जाण नक्कीच होईल, असे कन्हैयाकुमार म्हणाला. जागोजागी स्वातंत्र्यावर हल्ले होत आहेत. त्याचा प्रतिकार तुम्ही कधी करणार. जोपर्यंत सहन करू, तोपर्यंत हल्ले होणारच. विखुरलेला समाज संघटित झाला तर शक्ती दिसेल आणि कुणी हल्ला करण्याची हिंम्मत करणार नाही, असे प्रा. हरिभाऊ केदार म्हणाले. या देशात हुकूमशाही येत आहे. धर्माधता वाढत आहे. ते थांबवण्यासाठी पावनखिंड लढावी लागेल आणि त्यासाठी सर्वाना एकत्र यावे लागेल, असा संदेश या पुस्तकातून देण्यात आल्याचे डॉ. यशवंत मनोहर म्हणाले. कन्हैयाला आदर्श तरुणाची उपमा देत त्याच्या स्वातंत्र्याच्या लढय़ात परिवर्तनवादी समाज सोबत असल्याचे ते म्हणाले.

फेसवॉश अन् देशद्रोह

देशातील सत्ता निरंकुशतेवर आमचा आक्षेप आहे. लोकांनीही त्यावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. विरोधात बोललो तर ‘देशद्रोह’ ठरतो. घटनेनुसार शासनव्यवस्था चालवण्याची मागणी केली तर माझ्य़ावरही तोच ठपका ठेवण्यात आला. पुढच्या काळात पतंजलीचा ‘फेसवॉश’ नाही लावला, तरीही तुम्हाला देशद्रोही मानले जाईल, असे कन्हैयाकुमार म्हणाला.

अखेर मोदी दीक्षाभूमीवर

पुस्तकाच्या प्रकाशनासाठी मी येणार नव्हतो, पण दीक्षाभूमीला यायचे होते. येथे आल्यावर कळले की उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी पण दीक्षाभूमीवर येणार आहेत. मी येतो आहे म्हणून ते येत आहेत, असे मी म्हणणार नाही, कारण तो ‘लहान तोंडी मोठा घास’ होईल. मात्र, कारण काहीही असले तरी उशिरा का होईना पंतप्रधानांनासुद्धा बाबासाहेबांची आठवण आली, हेही नसे थोडके, असे कन्हैयाकुमार म्हणाला!

अल्प उपस्थिती

एक वर्षांपूर्वी याच सभागृहात कन्हैयाकुमारचे भाषण झाले तेव्हा सभागृह तरुणाईने तुडूंब भरले होते. याच गर्दीतून त्याच्यादिशेने चप्पल भिरकावण्याचा प्रकारही घडला होता. आजच्या कार्यक्रमात सभागृह मात्र बरेच रिकामे दिसले.