उच्च न्यायालयात महापालिकेचे प्रतिज्ञापत्र

नागपूर : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खासगी रुग्णालयांना प्राणवायू निर्मिती प्रकल्पांची परवानगी देण्यासाठी प्रक्रिया प्रारंभ करण्यात आली असून आतापर्यंत एक प्रस्ताव प्राप्त झाला आहे, अशी माहिती  महापालिकेने  उच्च न्यायालयात दिली.

शहरातील रुग्णालयांमध्ये प्राणवायूची मागणी वाढत असून त्यादृष्टीने पुरवठा खूप कमी आहे. प्राणवायूचा पुरवठा होण्यासाठी खासगी रुग्णालयांना प्राणवायू निर्मितीची परवानगी देण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले होते. या विषयावर महापालिकेने प्रतिज्ञापत्र दाखल करून सांगितले की, या दिशेने प्रक्रिया प्रारंभ करण्यात आली असून कृष्णा दायमा यांनी सवलतीच्या दरात प्राणवायू भरण्याचे प्रकल्प सुरू करण्यासाठी वाडी परिसरातील जुने पथकर नाका परिसरात जागेची मागणी केली आहे. या प्रस्तावावर महापालिका प्रामुख्याने विचार करीत आहे. दुसरीकडे तीन आयुर्वेदिक रुग्णालय आणि एक ईएसआयसी रुग्णालयांची महापालिकेने पाहणी केली आहे, भाऊसाहेब मुळक आयुर्वेदिक महाविद्यालयात १०० खाटा असून तेथे करोनाग्रस्तांवर उपचार करता येऊ शकते.

याकरिता तेथे प्राणवायूची व्यवस्था करण्यात येत असून दहा दिवसांत ती पूर्ण होऊन रुग्णांवर उपचार सुरू होतील. श्री आयुर्वेद महाविद्यालयातही ताबडतोब उपचाराला प्रारंभ करण्यात येत असून त्या ठिकाणी असलेल्या १०० खाटांवर मैत्री परिवार संस्थेच्या मदतीने करोनाग्रस्तांवर उपचार करण्यात येईल. शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या इमारतीच्या नूतनीकरणाचे काम सुरू असल्यान तिचा वापर करता येणार नाही. ईएसआयसी रुग्णालयात १५० खाटा असून ते राज्य सरकारच्या अखत्यारित आहे. रुग्णालयाचे अधिग्रहण करून करोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती महापालिकेने आपल्या प्रतिज्ञापत्रात दिली. त्याशिवाय पाचपावली परिसरात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. रेल्वेच्या मदतीने केटीनगर आणि पाचपावली सूतिकागृहातही उपचाराची व्यवस्था करण्यात येत आहे, असेही प्रतिज्ञापत्रात नमूद आहे. करोना विषयावरील याचिकेवर उद्या गुरुवारी उच्च न्यायालयात सुनावणी होईल.