आठवडय़ातून एक दिवस वापरण्याची सूचना; सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वस्रसंहिता

नागपूर : आठवडय़ातून फक्त एकदिवस खादीच्या कपडय़ांचा वापर करावा, या राज्य शासनाच्या सूचनेचे पालन सरकारी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडूनही केले जात नाही. खादीला प्रोत्साहन मिळावे म्हणून ही सूचना करण्यात आली हे येथे उल्लेखनीय.

राज्य शासनाने त्यांच्या कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी ८ डिसेंबर रोजी वस्रसंहितेबाबत परिपत्रक जारी केले आहे. त्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आठवडय़ातून एक दिवस (शुक्रवारी)  खादीच्या कपडय़ांचा वापर करावा, असे नमूद करण्यात आले आहे.  त्यामुळे हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. यापूर्वी जारी वस्रसंहितेतही खादीच्या कपडय़ाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र यापूर्वीचा अनुभव लक्षात घेता नव्या वस्त्रसंहितेचे पालन कितपत केले जाईल, याबाबत शंकाच आहे. जिल्ह्य़ात वीस हजारावर सरकारी कर्मचारी आहे.

इतकीच संख्या खासगी व कंत्राटी कर्मचाऱ्यांची आहे. एक दिवस जरी त्यांनी खादीच्या कपडय़ाचा वापर केला तर सरकारचा खादीला प्रोत्साहन देण्याचा उद्देश सफल होईल. पण अधिकारी व कर्मचाऱ्यांना खादीच्या कपडय़ांचे वावडेच आहे.

यासंदर्भात  विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयांसह नव्या व जुन्या प्रशासकीय भवनातील काही कर्मचाऱ्यांशी चर्चा केली असता बुहतेकांना तर खादीबाबतच्या सूचनाही माहीत नव्हत्या. काहींनी स्वातंत्र्य दिनी आम्ही खादीचाच वापर करतो, असे सांगितले तर काहींनी सरकार जोपर्यंत सक्ती करीत नाही, तोपर्यंत काहीच होणार नाही याकडे लक्ष वेधले.

नव्या वस्रसंहितेनुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रामुख्याने जीन्स पॅन्ट व टी शर्ट वापरण्यास तसेच कार्यालयात स्लीपर(चप्पल) घालण्यास मनाई केली आहे. तसेच गडद रंगाचे कपडे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांनीही या संहितेचे पालन करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. सरकारी कार्यालयात तरुण अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये जीन्सचा वापर हा सामान्य आहे. पण खादीच्या कपडय़ाचा वापर स्वातंत्र दिन किंवा गणराज्य दिनाच्या कार्यक्रमाचा अपवाद सोडला तर इतर वेळी  कर्मचारी करीत नाही. मधल्या काळात काही कर्मचारी  खादीचे ‘मोदी जॅकेट’ वापरत होते. पण ते पुढारीपणाचे लक्षण असल्याचे वरिष्ठांकडून बजावण्यात आल्याने आता त्याचाही वापर कमी झाला आहे.

सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महल्ले  याबाबत म्हणाले, खादीचा वापर कर्मचारी करीतच नाही असे नाही. अनेक अधिकारी व कर्मचारी नियमित खादीचे कपडे वापरतात. पण त्याचे प्रमाण कमी आहे. सरकारने याबाबत सक्ती केल्यास प्रमाण वाढू शकते. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांसाठी वस्रसंहिता लागू केली असली तरी याबाबत संभ्रम आहे.

तृतीयश्रेणी महसूल कर्मचारी संघटनेचे नेते ईश्वर बुधे यांनी सरकारवर टीका केली. सुरक्षा एजन्सीला ड्रेसकोड असतो, आम्ही सुरक्षा सैनिक नाही तर सरकारी कर्मचारी आहोत, असे बुधे म्हणाले. खादीचा वापर वाढायला हवा, पण त्यासाठी सर्वच पातळीवर प्रयत्न होणे आवश्यक आहे.