एअर व्हाईस मार्शल (निवृत्त) सूर्यकांत चाफेकर यांचे मत; लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट
पुलवामा हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांविरुद्ध कठोर कारवाई केली. या कारवाईला जगभरातून समर्थनही मिळाले. कुटनीतीच्या दृष्टीने सद्यस्थितीत भारताचे पारडे जड असून पाकिस्तानावर आंतरराष्ट्रीय दबाव वाढला आहे. पाकिस्तानवरील हा दबाब कायम ठेवून व भारताला मिळत असलेल्या आंतरराष्ट्रीय समर्थनाच्या बळावर दहशतवाद कमी करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, असे मत एअर व्हाईस मार्शल (निवृत्त) सूर्यकांत चाफेकर यांनी व्यक्त केले.
लोकसत्ता कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीत त्यांनी सीआरपीएफ जवानांवर हल्ला, भारताने एअर सर्जिकल स्ट्राईक करून दिलेले प्रत्युत्तर आणि पाकिस्तानी वैमानिकांनी भारताच्या लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा केलेला प्रयत्न, या पाश्र्वभूमीवर सविस्तर चर्चा केली. चाफेकर म्हणाले, प्रतिउत्तर देण्यासाठी साधारणत: वायुदलाचा वापर केला जात नाही. भारत देखील आजवर वायुदलाचा वापर करीत नव्हता. कारण वायुदलाचा आवाका मोठा आहे. वायुदलामुळे अंतर आणि वेळ फारच कमी होते. त्यामुळे वायुदलाच्या वापरानंतर युद्ध सुरू होण्याची शक्यता असते. वायुदल हे अंतिम अस्त्र समजले जाते. युद्ध करायचे असेल तरच वायुदल वापरले जाते. भारत सरकारने पहिल्यांदाच वायुदलाचा वापर केला. लष्कराचा वापर करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती लागते. शिवाय बिनचूक आणि योग्यवेळी निर्णय घेणे आवश्यक असते. पुलवामा हल्ल्यानंतर सरकारने निर्णय घेतला आणि सहा ते सात दिवसांच्या तयारीनंतर पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले. वायुदलाचा वापर करूनही युद्ध भडकू दिले नाही. सीमेवरील भागलपूर आणि आणखी काही ठिकाणी नागरी वस्त्यांना लागून दहशतवादी अड्डे असल्याची माहिती भारताकडे आहे. ते सीमारेषेपासून जवळ आहेत, परंतु सर्वसामान्य नागरिक मारले जाऊ नये. तसेच इतर कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून जंगल आणि डोंगराळ भागातील तळाला लक्ष्य करण्यात आले. अंधाऱ्या रात्री, डोंगराळ भागात जेथे खालचे दिसत नाही आणि मधलेही दिसत नाही, अशा ठिकाणी कारवाई करणे प्रचंड जिकरीचे काम असते. परंतु भारतीय सैनिक आपले नुकसान होऊ न देता परत आले. पाकिस्तान आपल्या भूप्रदेशावरील दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करीत नाही. त्यामुळे आम्हालाच दहशतवाद्यांच्याविरुद्ध कारवाई करणे भाग पडले, असे भारताने जगाला सांगितले. भारतीय वायुदलाने केवळ दहशतवाद्यांना लक्ष्य केले. दुसरे कुठलेही नुकसान केले नाही. त्यामुळे जगाच्या पातळीवर भारताची प्रतिमा उजळली आणि पाकिस्तान एकटा पडला. त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण झाला. या दबावाचा कौशल्याने वापर करीत पाकिस्तानाला दहशताद्यांविरोधात ठोस भूमिका घेण्यास भाग पाडणे महत्त्वाचे आहे. अशा डावपेचातून काही प्रमाणात का होईना दहशतवाद्यांवर लगाम लागू शकते. माझे अर्धे आयुष्य चंदीगडला गेले आहे. ज्या भागात ही कारवाई झाली, तो फारच कठीण असा हा भूप्रदेश आहे. रात्री या भागात विमान उडवणे अतिशय कठीण आहे. पाकिस्तानला तर धक्काच बसला. कारण, आपल्याकडे अद्ययावत विमाने नाहीत. आपण जुन्या तंत्रज्ञानाला अपग्रेड केले आणि अशा युद्ध विमानांच्या आधारे सर्जिकल स्ट्राईक यशस्वी केले. अद्ययावत युद्ध विमाने मिळाल्यास भारतीय वायुदल काय करू शकेल, याचा अंदाज जगाला आला असेल.
पाकिस्तान वायुदलाच्या आवाक्यात आहे. भारत हवाई दलाचा वापर करू शकते, हे समजल्यावर दहशतवाद्यांना त्यांच्या भूमीवर प्रशिक्षण देणे सोपे राहणार नाही, असेही ते म्हणाले.
..म्हणून अभिनंदनने उडी घेतली
पाकिस्तानची युद्ध विमाने उडताना आपल्या रडारवर येतात. पण, ते त्यांच्या देशात फिरतात आहेत की आपल्या दिशेने येत आहेत हे लगेच कळत नाही. ७०० ते ८०० किमी प्रतितास गतीने विमाने येतात. सीमा ओलांडत आहे की नाही, हे समजेपर्यंत केवळ ३० ते ४० किमी अंतर उरलेले असते. म्हणजे प्रत्युत्तर द्यायला वेळ फार कमी असतो. त्यांच्या भूप्रदेशात आपण काहीही करू शकत नाही. म्हणून त्यांना सीमारेषा ओलांडू देण्यात आली. सज्ज असलेल्या भारतीय युद्धविमानांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. भारतीय युद्धविमान दिसताच ते मागे वळले, परंतु विंग कमांडर अभिनंदनच्या विमानला गोळी घातली. त्यामुळे तो पॅराशूटच्या आधारे बाहेर पडला, परंतु दुर्दैवाने पाकिस्तानात उतरला. उर्वरित दोन विमाने मात्र सुखरूप परतली.
पाकिस्तानचा पुळचटपणा
भारत कधीही हवाई हल्ला करणार नाही, असे पाकिस्तानला वाटत होते. भारताने कारवाई केल्यानंतर त्यांना धक्का बसला. त्यानंतर त्यांनी तुम्ही सीमा रेषा ओलांडली तर आम्ही ओलांडू, असा बालिशपणा केला. प्रत्युत्तर देण्यासाठी साधारणत: हवाई तळाला लक्ष्य केले जाते, परंतु त्यांनी केवळ सीमा रेषा ओलांडली आणि भारतीय वैमानिकांनी पाठलाग करताच पळून गेले. काही तरी करायचे म्हणून जाताना बॉम्ब टाकले. स्थानिक लोकांना काय उत्तर द्यावे म्हणून हा पाकिस्तानने केलेला पुळचटपणा होता, असे चाफेकरही म्हणाले.
उन्माद करणारे लगेच बदलतात
भारताने पाकिस्तानला धडा शिकवावा, युद्ध झालेच पाहिजे, अशा घोषणा देऊन काही लोक उन्माद घालतात, परंतु हेच उन्माद करणारे त्यांचे हितसंबंध धोक्यात येताच बदलतात. युद्धाची खरच गरज आहे का, असे प्रश्न विचारायला लागतात. परंतु सरकार किंवा लष्कर अशाप्रकारच्या उन्मादाला बळी पडत नाही. अशा लोकांनी कितीही बोंबा मारल्या तरी सरकार आणि लष्कर आपल्या पद्धतीनेच निर्णय घेत असते. म्हणूनच पहाटे ३.३० वाजता युद्धविमाने पाठवायच्या आधी तिन्ही सशस्त्र दल पूर्णत: तयार होते, याकडेही चाफेकर यांनी लक्ष वेधले.