देवेश गोंडाणे

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट-क पदाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निवड यादीनुसार भरतीप्रक्रि येमध्ये मोठा गैरप्रकार झाल्याचे दिसून येत आहे. निवड झालेल्या पहिल्या क्रमांकाच्या काही उमदेवारांना २०० पैकी १९८ गुण मिळाल्याचे समोर आले आहे. परीक्षा तज्ज्ञांच्या मते, इतके गुण मिळवणे अशक्य आहे. दुसरीकडे परीक्षेतील गैरप्रकारामुळेच  इतके गुण मिळवता आल्याचा आरोप उमेदवारांकडून होत आहे. याविरोधात एमपीएससी समन्वय समिती   न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार  आहेत.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट-क पदासाठी २८ फेब्रुवारीला झालेल्या परीक्षेदरम्यान राज्यभरातील परीक्षा केंद्रांवर गोंधळ उडाल्याने परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आता दोन दिवसांआधी जाहीर करण्यात आलेल्या निवड यादीवर उमेदवारांनी आक्षेप घेतला आहे. आरोग्य विभागीय उपसंचालकांकडून विविध पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना त्यांचे नियुक्ती पत्र ई-मेलने पाठवण्यात आले आहेत. अकोला उपसंचालकांनी पाठवलेल्या एका पत्रातील मजकुरानुसार, मे जिंजर वेब कंपनी यांच्याकडून प्राप्त झालेल्या गुणवत्ता यादीनुसार समुपदेशन फेरीसाठी नियुक्तीपत्र देण्यात आल्याचा संदर्भ आहे. या पत्रानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर निवड यादी प्रसिद्ध झाली आहे. २२ एप्रिलला मूळ कागदपत्रांसह उमेदवाराला समुपदेशनासाठी उपस्थित राहायचे आहे. विशेष म्हणजे, आरोग्य विभागाने निवड यादी जाहीर करण्याआधीच उमेदवारांना नियुक्तीपत्र पाठवले होते. अन्य उमेदवारांनी आक्षेप घेतल्याने आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर सोमवारपासून विविध पदांची निवड यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये एका पदासाठी दहा ते पंधरा उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून यामध्ये एकसूत्रता नसल्याची माहिती आहे. या यादीमध्ये काही उमेदवारांना १९८, १९६ असे गुण असल्याचेही समोर आले आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या एका माजी सदस्यांनी नाव न छावण्याच्या अटीवर सांगितले की, २०० पैकी १९८ गुण मिळणे शक्य नाही. परीक्षेतील वेळ आणि प्रश्न यांचा कितीही ताळमेळ बसवला तरी इतके गुण मिळवता येत नाही. या आक्षेपामुळे निवड यादी वादात सापडली आहे. अनेक उमेदवारांनी या निवड यादीविरोधात आवाज उठवला असून एमपीएससी समन्वय समितीने याविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली आहे.

शंकेला वाव

आरोग्य विभागाच्या परीक्षेमध्ये राज्यभर गोंधळ उडाला होता तर औरंगाबाद भागातील गैरप्रकार घडवून आणणाऱ्या टोळीला पोलिसांनी पकडले होते. आता निवड यादीतील उमेदवारांचे नाव आणि पत्ता बघता  बहुतांश उमेदवार परीक्षेत गैरप्रकाराचे प्रकरण उघडकीस आलेल्या परिसरातीलच असल्याचे दिसून येते. त्यामुळे शंके ला वाव असल्याचा आरोपही उमेदवारांनी केला आहे.

परीक्षेची काठिण्य पातळी पाहता २०० पैकी १९८  गुण मिळणे शक्य नाही.  आरोग्य विभागाच्या निकालावरून यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट होते. यामुळे या भरती प्रक्रि येला कायदेशीर आवाहन देण्यात येणार आहे.

– निलेश गायकवाड, सचिव, एमपीएससी समन्वय समिती.