जेट एअरवेजने गाशा गुंडाळल्याचा परिणाम

देशांतर्गत विमान सेवा देणाऱ्या कंपन्यांनी प्रवासी भाडे कमी ठेवल्याने मध्यमवर्गीय विमानाने प्रवास करू लागले. त्यांना हवाई प्रवास अंगवळणी पडू लागला, परंतु या कंपन्यांनी प्रवासभाडे वाढवल्याने त्यांची पंचाईत झाली आहे. उन्हाळ्यात प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढल्याने व  जेट एअरवेजने गाशा गुंडाळल्याने नागपुरातून दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळुरू आणि चेन्नईचे विमान भाडे वाढले आहे. मुंबई, पुणे, दिल्लीसाठी नागपूरहून येत्या रविवारचे भाडे नेहमीपेक्षा दुप्पट झाले आहे.

जेट एअरवेजची नागपूरहून मुंबई, दिल्ली, इंदूर आणि अलाहाबाद सेवा बंद झाली आहे. त्यामुळे मुंबई आणि दिल्लीकडे जाणाऱ्या विमानांना गर्दी वाढली आहे. उन्हाळ्याच्या सुटय़ांमुळे लग्न समारंभ, पर्यटनासाठी विमानांना गर्दी आहे. मध्यमवर्गीय देखील वेळीच बचत व्हावी म्हणून विमानाने प्रवास करणे पसंत करतात. नागपूरहून नवी दिल्ली, मुंबई, पुणे आणि बंगळुरूकडे जाणाऱ्या कोणत्याही विमान कंपन्यांचे भाडे सरासरी सहा ते आठ हजारांच्या खाली नाही. १९ एप्रिल आणि २१ एप्रिलला काही मार्गावर दुप्पटीहून अधिक दर झाले आहे. विमान भाडे निश्चित नाहीत. तिकीट खरेदी वाढली की, आपोआप प्रवास भाडे वाढवले जाते. जेवढय़ा जास्त विमानाची आसने रिकामी तेवढे दर कमी, असे हे सूत्र आहे. येत्या रविवारी, २१ एप्रिलला नागपूर ते दिल्ली सर्वाधिक बुकिंग आहे. त्यामुळे नागपूर ते दिल्ली विमान सेवा देणाऱ्या एअर इंडिया आणि इंडिगोचे प्रवास भाडे वाढले आहेत. रविवारचे एअर इंडियाचे नागपूर ते नवी दिल्ली प्रवासाचे भाडे २० हजार ४१३ रुपये आहे. हे दर गुरुवारी दुपारी चार वाजेपर्यंत होते. ते  पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.  इंडिगोने रविवारी नागपूरहून दिल्ली जायचे असल्यास १० हजार ७७ रुपये भाडे पडणार आहे. १९ एप्रिलला नागपूर ते दिल्ली प्रवासासाठी इंडिगोच्या विमानाचे भाडे १३ हजार २२७ रुपयांवर गेले होते.

नागपूरहून मुंबईला २१ एप्रिलला इंडिगोने जायचे असल्यास १५ हजार ३७८ रुपये आणि एअर इंडियासाठी १७ हजार ६८३ रुपये मोजावे लागतील. मुंबईहून १९ एप्रिलला नागपुरात यायचे झाल्यास एअर इंडियाच्या विमानाचे भाडे दर १५ हजार ३८५ रुपये होते. इंडिगो विमान प्रवास भाडे १३ हजार ६६१ रुपये गुरुवारी दुपारी ४ वाजेपर्यंत होते.  १९ एप्रिलला पुणे ते नागपूर विमान प्रवास देखील महागला . पुण्याहून नागपूरला इंडिगो विमानाने येण्यासाठी १६ हजार २५९ रुपये लागतील.  तसेच गोअरही ११ हजार ९३६ रुपये भाडे आकारत होते. मध्य रात्री १२.५० मिनिटांनी नागपूरकडे झेपावणाऱ्या इंडिगोच्या विमानाचे भाडे १३ हजार ९३९ रुपये एवढे होते. बंगळुरूहून नागपूरला २१ एप्रिलला येणाऱ्यांना देखील नेहमीपेक्षा अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. इंडिगोचे त्या दिवशीच्या तीनही विमानांचे प्रवास भाडे १२ हजार १८१ रुपयांपर्यंत गेले होते. दरम्यान, डीजीसीएचे विमान प्रवास भाडे आकारण्यावर नियंत्रण आहे, परंतु त्यांनी अधिकतम मर्यादा दिली आहे. तसेच विमान वाहतूक कंपन्यांना दर कमी अधिक करण्याचे अधिकार आहेत, असे  एमआयएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.