मुख्यालय बदलण्याला विरोध झाला होता

नागपूर : उच्च न्यायालयाचे न्या. झका हक यांचे मुख्यालय नागपुरातून औरंगाबादला बदलण्याच्या निर्णयाला प्रचंड विरोध झाल्यानंतर अखेर दीड महिन्यांनी मुख्य न्यायमूर्ती न्या. भूषण धर्माधिकारी यांनी त्यांची बदली नागपुरात केली आहे. या निर्णयाचे उपराजधानीतील वकिलांनी स्वागत केले आहे.

प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्यात त्यांचा हातखंडा आहे. शिवाय निबंधक कार्यालयात एक शिस्त लावण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. कोणत्याही दबावात न येता काम करण्याची त्यांची शैली अनेकांनी खटकली व काहींनी अंतर्गत राजकारणासाठी त्यांची तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा न करताच तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग यांनी त्यांचे मुख्यालय नागपूरहून औरंगाबाद येथे बदलण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयाविरुद्ध उपराजधानीतील वकिलांनी स्वाक्षरी अभियान राबवले होते.   करोनाच्या पार्श्वभूमीवर न्यायमूर्तीचे वेळापत्रक बदलत असून न्या. हक यांची बदली नागुपरात करण्यात आली असून २० एप्रिलपासून त्यांचे मुख्यालय नागपूर राहणार आहे.