प्रकल्प उभारणी आणि इमारत बांधकाम क्षेत्रात नवनवीन प्रयोग करणाऱ्या महामेट्रोने कस्तुरचंद पार्कजवळ होणाऱ्या नवीन स्थानकाला आगळ्यावेगळ्या पद्धतीने विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

विधानभवन, रिझव्‍‌र्ह बँक, झिरो माईल्स आणि कस्तुरचंद पार्क या सर्व ऐतिहासिक स्थळांच्या जवळ उभे राहणारे हे स्थानक शहराच्या सौंदर्यात आणखी भर घालणारे ठरेल, असा विश्वास महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी व्यक्त केला आहे.

महामेट्रोने शहरातील मेट्रो स्थानकांची रचना इंग्रजकालीन वास्तूंच्या धर्तीवर केली आहे. सीताबर्डी किल्ला नागपूरचा ऐतिहासिक वारसा आहे. कस्तुरचंद पार्कवरील स्थापित भोसलेकालीन तोफ आणि तेथील इमारत लक्षवेधी आहे. या जागांचे महत्त्व लक्षात घेऊनच येथे होणारे स्थानक आगळे वेगळे असावे म्हणून प्रयत्न केले जात आहे. स्थानकाच्या छताची उभारणी अशा पद्धतीने केली जाईल की प्रवाशांना तेथून मोकळ्या आकाशाचे दर्शन होईल. खाली रस्ता आणि त्यावरून धावणारी मेट्रो असे या स्थानकाचे स्वरूप असेल.

स्थानकावर येण्यासाठी दोन्ही बाजूने प्रवेशद्वाराची सोय असेल. येथे वृद्ध, अंध आणि दिव्यांगांसाठी विशेष लिफ्टची व्यवस्था केली जाणार असून त्याद्वारे प्रवाशांना थेट मेट्रो कोचपर्यंत जाणे सोईचे होईल. सदर, मोहननगर, खलाशी लाईन, सिव्हिल लाईन्स या भागातील नागरिक तसेच सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासाठी हे स्थानक सोयीचे ठरेल, असे महामेट्रो व्यवस्थापनाला वाटते. मेट्रोचे बर्डी आणि झिरो माईल स्थानकाची उभारणी सुद्धा जागतिक पातळीवरील वास्तुविशारदांच्या माध्यमातून होत असून या दोन्ही इमारती शहरासाठी नवीन ओळख देणाऱ्या ठरणार आहेत.

मेट्रोच्या खापरी ते विमानतळ या जमिनीवरून धावणाऱ्या मार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून येथून लवकरच मेट्रोची चाचणी घेतली जाणार आहे. वर्धा मार्गावर डबल डेकर उड्डाण पुलाचे काम सुरू झाले आहे. हिंगणा तसेच कामठी मार्गावरही खांब उभारणी केली जात आहे.