आमदार कृष्णा खोपडे यांचा टोला

दोन वर्षांच्या काळात मिहान प्रकल्पाला गती देत हजारो बेरोजगारांना रोजगार निर्माण करून दिला आहे. पतंजलीच्या माध्यमातून रामदेवबाबांनी २३५ एकर जमीन निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून घेतली असून ते आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प सुरू करीत आहेत. या माध्यमातून ५० हजार युवकांना रोजगार मिळणार आहे. माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी केलेली टीका हास्यास्पद व केविलवाणी असून विकास

कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. काँग्रेसने शहराच्या संस्कृतीबाबत आम्हाला गोष्टी न शिकवता विकास कामांचे स्वागत करावे, अशी टीका आमदार कृष्णा खोपडे यांनी केली.

सात वेळा लोकसभेत निवडून आलेले विलास मुत्तेमवार यांना टीनपाट नेते म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संभावणा केल्यामुळे काँग्रेसच्या कार्यकत्यार्ंनी संताप व्यक्त केला. काँग्रेस शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी त्याचा निषेध करून टीनपाट  नेते व सोन्याचांदीचे पाट असलेले नेते यामधील व्याख्या गडकरी यांनी स्पष्ट करावी अशी मागणी केली होती. त्यावर खोपडे म्हणाले, केंद्रात आणि राज्यात भाजपती सत्ता आल्यानंतर दोन वर्षांच्या काळात अनेक प्रकल्पांना आणि विकास कामांना गती मिळत असताना या विकास कामाचे स्वागत न करता पक्षाच्या संस्कृतीप्रमाणे विरोध करण्याची भूमिका घेत जनतेती दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

केंद्रात अटलबिहारी वाजपेयींचे सरकार असताना व राज्यात नितीन गडकरी मंत्री असताना मिहानला मान्यता मिळवून दिली. त्यानंतर सरकार बदलल्यानंतर विलास मुत्तेमवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांच्या वादामध्ये मिहानचे काम ठप्प झाले होते, असा आरोप खोपडे यांनी केला.

पतंजलीला दिलेल्या जागेची चौकशी केली जात असेल तर काँग्रेसच्या नेत्यांना दिलेल्या जागासंदर्भात सीबीआयची चौकशी करण्याची मागणी मुत्तेमवार यांनी केली तर भाजप त्यांना साथ देईल. शहरातील जनतेने त्यांना अनेकदा संधी दिली मात्र जनहिताचा प्रकल्प तर आणलाच नाही उलट शासकीय भूखंड हडपून स्वविकासात भरीव योगदान दिले, असा आरोप त्यांनी केला.