करोनाबाधित सापडण्याचे प्रमाण जास्त असल्याने शहरातील सतरंजीपुरा, मोमीनपुरा, गड्डीगोदाम, नाईक तलाव, बांगलादेश हे सर्व परिसर हॉटस्पॉट झाले आहेत. त्यात उत्तर नागपुरातील दाट वस्ती असलेली लष्करीबाग झोपम्डपट्टी परिसराची भर पडताना दिसत आहे. येथील  शंभरावर लोकांना विलगीकरणात ठेवले आहे. परिसर प्रतिबंधित करण्यात आला असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

उत्तर नागपुरातील एका खासगी रुग्णालयातील परिचारिकेच्या संपर्कात आलेली व्यक्ती व गांधीबाग परिसरात काम करणाऱ्या एका महिलेच्या संपर्कामुळे लष्करीबाग परिसरात करोनाचा रुग्ण आढळल्याची प्राथमिक माहिती समोर आली. यामुळे लष्करीबाग परिसरातील ४०० घरे असलेल्या झोपडपट्टीतील शंभरावर लोकांचे विलगीकरण करण्यात आले आहे. गुरुवापर्यंत या परिसरात १४ रुग्ण बाधित आढळले होते. त्यात तीन ते चार कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे. सध्या परिसरातील  विलगीकरणात असलेल्यांचा तपासणी अहवाल आलेला नाही. त्याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, लष्करीबाग परिसरातील रुग्ण असलेला भाग महापालिका प्रशासनाने बंद केला आहे. तर काही गल्ली बोळात नागरिकांनी कठडे लावले आहेत. या झोपडपट्टीत बहुतांश कामगार वर्ग असल्यामुळे त्यांना बाहेर कामे मिळेनासे झाली आहेत. विशेषत: घरकाम करणाऱ्या महिल जरीपटका, इंदोरा भागात कामाला जात असतात. पण त्यांना येऊ नका असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याचे नागरिकांनी सांगितले. या प्रभागाचे नगरसेवक संदीप सहारे म्हणाले, करोना बाधित सापडलेला झोपडपट्टी परिसर असल्याने चिंता वाढली आहे. सध्या १४ बाधित असून इतरांचे अहवाल यायचे आहेत.

१९ नवीन करोनाग्रस्तांची भर

आज शुक्रवारी दिवसभरात केवळ १९ रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाला अंशत: दिलासा मिळाला आहे. शहरात करोनाबाधितांची एकूण संख्या ९३९ वर पोहचली आहे.  आज आढळलेल्या रुग्णांमध्ये एक अकोल्याचा रहिवासी आहे. व्हेटरनरी प्रयोगशाळेत झालेल्या चाचणीत तीन जणांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले असून हे सर्व आमदार निवासातील विलगीकरण केंद्रातील आहेत. यामध्ये एक मोमीनपुरा, एक बांगलादेश तर एक सावनेरचा रहिवासी आहे. मेयोच्या अहवालात सहा रुग्ण बाधित असल्याचे समोर आले आहे. यामध्ये एक टेका येथील हबीबनगरचा, एक निकालस मंदिर, एक मोमीनपुरा, दोन चंद्रमणीनगर तर एक कोराडी येथील सिद्धार्थनगरचा रहिवासी आहे. एक रुग्ण अमरावतीचा असून त्याची चाचणी खासगी प्रयोगशाळेत करण्यात आली होती.  सायंकाळी आलेल्या अहवालात  पाच रुग्णांची वाढ झाली. हे रुग्ण हंसापुरी, चंद्रमणीनगर, भोईपुरा आणि दोन राज्य राखीव पोलीस दल येथील आहेत. यामध्ये दोन रुग्णांचा अहवाल एम्स तर तीन जणांचा अहवाल खासगी प्रयोगशाळेतून आला. मेयो रुग्णालयातील तीन रुग्ण हे रिधोरा-काटोल येथील आहेत. शुक्रवारी मेयोतून पाच तर मेडिकलमधून १३ रुणांना सुट्टी देण्यात आली. विशेष म्हणजे, निकालस मंदिर व भोईपुरा या दोन नव्या परिसरात करोनाचा शिरकाव झाला आहे.

भोईपुरा व निकालस मंदिर परिसर प्रतिबंधित

करोनाबाधित आढळल्यामुळे गांधीबाग विभागात भोईपुरा व निकालस मंदिर परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे. भोईपुरा परिसरात दुर्गेश गौर यांचे घर, भागीरथ गौर, गुरुदीप सिंग व ज्योती नायक यांचा निवासस्थान परिसर तर निकालस मंदिर बाजार परिसरातील भाग बंद करण्यात आला. या दोन्ही भागातील ६० लोकांना विलगीकरणात पाठवले आहे.

झिंगबाई टाकळीतील कठडे कुणी हटवले?

झिंगबाई टाकळी परिसराला प्रतिबंधित करण्यात आले आहे. त्यासाठी सर्वत्र कठडेही उभारण्यात आलेत. परंतु हे कठडे हटवून कुणीही आत— बाहेर जात असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.  येथे एकही पोलीस किंवा महापालिकेचा अधिकारी बघायलाही तयार नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.

क्रीडा संकुले सुरू करण्याबाबत विचार!

केंद्र व राज्य शासनामार्फत दिलेल्या दिशानिर्देशांच्या अधीन राहून आणि  सामाजिक अंतर पालन होईल अशा खेळांसाठी क्रीडा संकुले सुरू करावी. अशी मागणी क्रीडा संघटनांनी केली आहे. याबाबत विचार करण्याचा निर्णय महापालिकेच्या क्रीडा समितीच्या बैठकीत घेण्यात आला. २१ जून रोजी योगदिन प्रत्येकाने घरीच राहून साजरा करावा, असे आवाहन क्रीडा समिती सभापती प्रमोद चिखले यांनी दिले.

घरी विवाह करण्यासाठी परवानगीची गरज नाही – आयुक्त

विवाह समारंभ घरीच ५० लोकांच्या उपस्थितीत करण्याची अनुमती आहे. मंगल कार्यालय, हॉटेल किंवा कुठल्याही सभागृहात करता येणार नाही. शासनाच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात असून घरी विवाह करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नसल्याचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी परिपत्रकातून स्पष्ट केले. शहरात तूर्तास समारंभांचे आयोजन टाळावे. लग्न समारंभातही ५० लोकांची परवानगी असली तरी किमान संख्या ठेवावी, असे आवाहन मुंढे यांनी केले आहे.