News Flash

‘स्कूलबस’ न तपासल्यास परवाने रद्द होणार, परिवहन आयुक्तांचे आदेश

स्कूलव्हॅन्सची तपासणी वेळेत व्हावी म्हणून प्रशासनाकडून या कामाला प्राधान्य दिले जात आहे.

शहरात केवळ ५०० वाहनांचीच तपासणी
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागपूरसह राज्यभरातील स्कूलबसची तपासणी प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) सुरू झाली आहे. तपासणीला अद्यापही शहरातील स्कूलबस चालकांचा प्रतिसाद नाही. शहरात १,५०० स्कूलबसेस व स्कूलव्हॅन्स असतांना त्यातील केवळ ५०० वाहनांनीच तपासणी झाली आहे. त्यातच १५ जूनपूर्वी तपासणी न करणाऱ्या स्कूलबसचे परवाने रद्द करण्याचे परिवहन आयुक्तांचे आदेश आरटीओ कार्यालयात धडकले आहेत. तसे झाल्यास शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांना ने-आण करण्याचा नवीन पेच पुढे येणार आहे.
नागपूरसह राज्याच्या वेगवेगळ्या भागात हजारो स्कूलबस, स्कूलव्हॅन्समध्ये लाखो शालेय विद्यार्थ्यांची ने-आण केली जाते. या वाहनांचे काही वर्षांपूर्वी वाढलेले अपघात बघता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाने कडक कायदे केले होते. त्यानुसार राज्यातील स्कूलबस, स्कूलव्हॅन, ऑटोरिक्षांमध्ये आवश्यक बाबींची एक मार्गदर्शक सूचना जारी करून तातडीने सगळ्या वाहनांमध्ये बदल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार या वाहनांमध्ये अग्निशामन यंत्रणा, त्यांचा रंग, त्यात काही अनुचित घडल्यास त्वरित बाहेर पडण्याकरिता आवश्यक असलेली आपातकालीन खिडकी, विद्यार्थ्यांना पकडण्याकरिता विशिष्ट प्रकारच्या दांडासह इतर बाबींचा समावेश होता.
नियमानुसार या वाहनात विद्यार्थ्यांना सांभाळण्यासाठी एक वाहक, वाहनात विद्यार्थिनी असल्यास महिला वाहकांसह इतरही अनेक बाबींचा समावेश केला गेला होता. या कायद्याचे पालन करण्यासाठी वारंवार शासनाकडून वाहनधारकांना सूचना करण्यात आल्या, परंतु त्याकडे स्कूलबसचालकांनी दुर्लक्ष केले. शेवटी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली. त्यात न्यायालयाने आदेश दिल्याने नागपूरसह राज्यभरातील सगळ्याच प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून १ मे ते ५ जूनदरम्यान सगळ्याच स्कूलबस, व्हॅनची तपासणीचे आदेश जारी झाले. न्यायालयाने आरटीओकडून स्कूलबसची तपासणी अपूर्ण असल्याचे बघून त्याला मुदतवाढ दिली.
परंतु त्यानंतरही अद्याप हव्या त्या संख्येने स्कूलबसचालकांचा तपासणीकडे कल नसल्याचे चित्र आहे. १३ जूनपर्यंत नागपूर शहरातील सुमारे १ हजार ५०० स्कूलबसेस वा स्कूलव्हॅन्सपैकी केवळ ५०० वाहनांचीच तपासणी झाल्याचे चित्र आहे. त्यातच राज्याच्या परिवहन आयुक्त श्याम वर्धने यांनी नुकताच एक आदेश राज्यातील सगळ्या प्रादेशिक परिवहन कार्यालयांना पाठवला असून त्यात १५ जूनपर्यंत तपासणी न करणाऱ्यांचे परवाने रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. तेव्हा शहरातील इतक्या मोठय़ा प्रमाणात स्कूलबसेस व स्कूलव्हॅन्सचे परवाने रद्द झाल्यास शालेय विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करण्याकरिता एक नवीन पेच पुढे येणार आहे.

नागपूर शहरातील स्कूलबसेस, स्कूलव्हॅन्सची तपासणी वेळेत व्हावी म्हणून प्रशासनाकडून या कामाला प्राधान्य दिले जात आहे. शहरात वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून आरटीओचे अधिकारी स्वत जास्त वाहन असलेल्या शाळेत जाऊन तपासणी करीत आहेत. लवकरच तपासणी पूर्ण होण्याची आशा आहे.
– रवींद्र भुयार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2016 3:54 am

Web Title: licenses will be canceled if school bus not check says transport commissioner order
टॅग : School Bus
Next Stories
1 विद्यापीठावर विद्यार्थ्यांची ‘सैराट’ मते
2 फुलपाखरांनीच दिली जगाची ओळख..
3 नाले साफसफाईच्या वादवरून समतानगरात दोन भावांचा खून
Just Now!
X